अ‍ॅपशहर

उत्सव रंगे ऑनलाइन मनोरंजनासंगे!

गणेशोत्सवात दर वर्षी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आल्याने पुणेकरांना रुखरुख लागून राहिली होती. त्यावर उपाय काढण्यासाठी काही सांस्कृतिक संस्था आणि निर्माते पुढे सरसावले आहेत.

Authored byआदित्य तानवडे | महाराष्ट्र टाइम्स 24 Aug 2020, 2:33 pm
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम उत्सव रंगे ऑनलाइन मनोरंजनासंगे!


गणेशोत्सवात दर वर्षी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आल्याने पुणेकरांना रुखरुख लागून राहिली होती. त्यावर उपाय काढण्यासाठी काही सांस्कृतिक संस्था आणि निर्माते पुढे सरसावले आहेत. संगीताचे कार्यक्रम, जादूचे प्रयोग, छोटी नाटके आणि कार्यक्रमांचे चित्रीकरण करून ते ऑनलाइन माध्यमाद्वारे रसिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार असून नाममात्र शुल्कामध्ये रसिकांना घरच्या घरीच कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. कार्यक्रमांच्या या नव्या ट्रेंडला रसिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

करोनामुळे यंदा गणेशोत्सवात होणाऱ्या शेकडो कार्यक्रमांवर गदा आली होती. दर वर्षी कलाकारांना या कार्यक्रमातून मिळणारा रोजगारही मोठा असल्याने त्यांच्या उत्पन्नाचाही प्रश्न निर्माण झाला होता. पुण्यातील काही निर्माते आणि सांस्कृतिक संस्थांनी यावर तोडगा काढला आहे. शहरातील काही नाट्यगृहे आणि सांस्कृतिक भवन घेऊन तिथे कार्यक्रमांचे चित्रीकरण करण्यात आले असून शुल्क स्वीकारून त्या कार्यक्रमाची लिंक रसिकांना देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या दिवशी रसिक प्रेक्षक 'लॉग इन' करून संपूर्ण कार्यक्रम घरच्या घरी पाहू शकणार आहेत. जादूचे प्रयोग, छोट्या नाटिका, गाण्याच्या कार्यक्रमांचा यामध्ये समावेश आहे. हे कार्यक्रम केवळ एका गणेश मंडळापुरते मर्यादित राहणार नसून पुण्यात, राज्यात एवढेच नव्हे; तर परदेशातही पाहता येणार आहेत. त्यामुळे आयोजकांना बऱ्यापैकी निधी मिळणार नसून त्यातून कलाकारांचे ठप्प झालेले अर्थचक्र पुन्हा एकदा सक्रिय होण्यास मदत होईल. ऑनलाइन पद्धतीने शुल्क आकारण्याची व्यवस्था करण्यात आल्याने रसिकांना कुठेही न जाता दर्जेदार कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे.

करोनामुळे समाजव्यवस्थेत अनेक बदल करावे लागत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाइन सादर करणे हाही त्यातील एक महत्त्वाचा बदल आहे. यातून प्रत्यक्ष सादरीकरणाचा अनुभव येणार नसला, तरी अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून कार्यक्रमांचे चित्रीकरण केले जात असल्याने रसिकांना कार्यक्रमाचा उत्तम अनुभव देण्याचा आयोजकांचा प्रयत्न राहणार आहे. गणेशोत्सव दिमाखात साजऱ्या करणाऱ्या काही गणेश मंडळे आणि सोसायट्यांकडून अशा प्रकारच्या कार्यक्रमांची मागणी होत असून घरबसल्या का होईना; पण यंदाचा गणेशोत्सव सांस्कृतिक विश्वाला काहीशी उभारी देणारा ठरणार आहे, हे मात्र निश्चित.


ऑनलाइन जादूचे प्रयोग आणि कार्यशाळा यांना मिळणारा प्रतिसाद उत्तम आहे. केवळ पुण्यातच नाही, तर परदेशात जिथे जिथे गणेशोत्सव साजरा होतो तिथेही कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. एकप्रकारे सांस्कृतिक विश्वाला संकटाच्या काळातही बाप्पाच्या कृपेने उभारी मिळते आहे. रसिकांनी ऑनलाइन कार्यक्रम ही संकल्पना स्वीकारली असून नकारात्मक वातावरण बाजूला सारण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होत आहे.

- जादूगार जितेंद्र रघुवीर


यंदाचा गणेशोत्सव प्रत्यक्ष साजरा होत नसला, तरी ऑनलाइन माध्यमाद्वारे नागरिक तो साजरा करत आहेत. आम्ही सातत्याने कार्यक्रमांचे चित्रीकरण करत असून त्यातून रोजगारही उपलब्ध होत आहेत. गाण्यांच्या कार्यक्रमांना जास्त मागणी असून रागदारी, भावसंगीत, चित्रपट संगीताच्या ऑनलाइन कार्यक्रमांना रसिक अधिक पसंती देत आहेत.

- निनाद सोलापूरकर, संगीतकार


परदेशात सर्वाधिक मागणी

पुण्या-मुंबईप्रमाणेच यंदा परदेशातही गणेशोत्सव साजरा करण्यावर बंधने आहेत. अशा वेळेला ऑनलाइन कार्यक्रम सादर करून उत्सव साजरा करण्यावर परदेशातील महाराष्ट्र मंडळांनी भर दिला आहे. दररोज वेगवेगळे कार्यक्रम परदेशात सादर केले जात असून परदेशात राहणारे भारतीय त्याचा सर्वाधिक आस्वाद घेताना पाहायला मिळत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज