म. टा. प्रतिनिधी, पुणे
माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपावरून अटक करण्यात आलेल्या नागपूर विद्यापीठातील प्राध्यापिका शोमा सेन यांनी जामीन मिळावा म्हणून पुन्हा अर्ज दाखल केला आहे. विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या कोर्टात त्यांनी अर्ज दाखल केला.
सेन यांनी यापूर्वीही जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र, पोलिसांनी जप्त केलेल्या कागदपत्रांत सेन यांनी बंदी घालण्यात आलेली संघटना सीपीआय, माओवादी यांच्या नेत्यांशी पत्रव्यवहार केल्याचे; तसेच त्या संबंधित संघटनांच्या विविध कारवायांमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. देशविरोधी कारवाईत त्यांचा सहभाग असल्याचे तपासात दिसून आले आहे. प्रथमदर्शनी आरोपीचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निर्दशनात येत आहे. सध्या तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, असे नमूद करून कोर्टाने त्यांचा अर्ज दोन नोव्हेंबर रोजी फेटाळला होता.
या प्रकरणात १५ नोव्हेंबर रोजी प्रा. सेन यांच्यासह सुधीर ढवळे, रोना विल्सन, महेश राऊत, अॅड. सुरेंद्र गडलिंग आणि भूमिगत असलेले कॉ. एम. ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे, किशनदा ऊर्फ प्रशांत बोस, प्रकाश ऊर्फ नवीन ऊर्फ रितुपर्ण गोस्वामी, कॉ. दिपू आणि कॉ. मंगलू अशा दहा जणांविरोधात पाच हजार १६० पानी दोषारोपत्र दाखल करण्यात आले आहे. दोषारोपत्र दाखल झाल्याने पुन्हा जामिनासाठी अर्ज करण्यात आल्याचे त्यांचे वकील अॅड. राहुल देशमुख यांनी सांगितले. अॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन यांच्या जामिनावरही सध्या युक्तिवाद सुरू आहे. जामीन आणि आरोपींनी केलेल्या इतर अर्जांवर आज, १७ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.