अ‍ॅपशहर

राजगडाचा ठेकेदार काळ्या यादीत

राजगडाच्या पद्मावती माचीवरील ऐतिहासिक सदरेच्या कामात अनियमितता आढळून आल्याने ठेकेदार अरुण लांजेवार यांना पुरातत्त्व विभागाने काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकले आहे.

Maharashtra Times 30 Jul 2016, 3:00 am
राजगडाचा ठेकेदार काळ्या यादीत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rajgad fort issue
राजगडाचा ठेकेदार काळ्या यादीत


म. टा. प्रतिनिधी, पुणे
राजगडाच्या पद्मावती माचीवरील ऐतिहासिक सदरेच्या कामात अनियमितता आढळून आल्याने ठेकेदार अरुण लांजेवार यांना पुरातत्त्व विभागाने काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकले आहे. त्यामुळे सदरेचे काम स्थगित असून नव्याने अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया राबविणार असल्याचे राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांनी कळविले आहे. राजगडावरील वास्तूंचे आणखी विद्रूपीकरण न होता गडावरील संवर्धनाची कामे ऐतिहासिक पद्धतीने व्हावीत, यासाठी दुर्गसंवर्धन समितीने पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने गडासाठी मास्टर प्लॅनही तयार केला आहे.
राजगडाचे नाव संभाव्य जागतिक वारसास्थळ (हेरिटेज साइट) म्हणून सुचविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राजगडावरील सदरेसह पद्मावती माचीवरील राजवाड्याचे तळे ते पाली दरवाजा या तटबंदीचे काम पुरातत्त्व विभागाने चुकीच्या पद्धतीने केले आहे. त्यामुळे तटबंदीचे विद्रूपीकरण झाले आहेच; मात्र महाद्वाराच्या बुरूजांवरील दगडी पाकळ्यांच्या जागी सलग बांधकाम केल्याने त्याच्या सौंदर्यालाही बाधा आली आहे. गडावरील मंदिरांमध्ये स्थानिकांनी भजी आणि पिठलं-भाकरीची हॉटेल्स थाटल्याने गडावर प्लास्टिकचे ग्लास, ताटे असा कचराही वाढू लागला आहे. हा कचरा राजरोसपणे गडाच्या तटावरून भिरकावला जातो आहे. ही गडाची वस्तुःस्थिती ‘राज’वैभव लुप्त होतेय या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या बुधवार, २७ जुलैच्या अंकात प्रसिद्ध झाली होती.
या वृत्ताची दखल घेत पुरातत्त्व विभागाने सदरेच्या कामात अनियमितता असल्याने अरुण लांजेवर यांच्याकडून काम काढून घेतल्याचे कळविले आहे. गडावर नव्याने बांधलेल्या तटबंदीवर कोपिंगचे काम बाकी असल्याचा; तसेच हे काम पूर्ण झाल्यावर ते मूळ तटबंदीस अनुरूप होईल, असा दावा पुरातत्त्व विभागाने केला आहे. गडावरील पद्मावती मंदिराचे आवार, रामेश्वर मंदिर तसेच पहारेकऱ्यांच्या देवड्यांमध्ये कोणालाही हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी नाही, असे करणाऱ्यांविरूद्ध कारवाईची ग्वाहीही देण्यात आली आहे. नव्याने अंदाजपत्रक आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करून राजसदरेचे उर्वरित काम हाती घेतले जाईल, असेही वाहणे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज