अ‍ॅपशहर

‘पदाधिकाऱ्यांना ‘त्यागा’ची संधी’

मानधनाच्या मुद्द्यावरून ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी साहित्य महामंडळ आणि संमेलन आयोजकांची खिल्ली उडवली.

Maharashtra Times 22 Nov 2017, 3:00 am
वात्रटिकाकारांनी उडविली साहित्य संस्थांची खिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ramdas phutane take a dig on sahitya mahamandal on remuneration issue of writers
‘पदाधिकाऱ्यांना ‘त्यागा’ची संधी’


म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘साहित्य महामंडळ आणि घटक संस्थांचे पदाधिकारी मराठी भाषेसाठी ३६५ दिवस रक्ताचे पाणी करून काम करतात. हे पदाधिकारी साहित्यिक नसतात तरीही उंची हॉटेलमध्ये राहतात. साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी त्यांनी प्रवास खर्च आणि राहण्याची व्यवस्था स्वत: करावी. मराठी भाषेसाठी एवढे ते तीन दिवस नक्कीच करू शकतील. मराठी भाषेवरील प्रेम सिद्ध करण्याची ही नामी संधी आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी ‘मटा’शी बोलताना साहित्य महामंडळ आणि संमेलन आयोजकांची खिल्ली उडवली.

बडोदा येथे ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. संमेलनामध्ये निमंत्रित लेखक व कवींच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था आयोजक संस्थेकडून केली जाणार आहे. निमंत्रितांनी मानधनाचा त्याग; तसेच प्रवासखर्च स्वतः करावा, असे आवाहन आयोजक संस्था असलेल्या मराठी वाङ्मय परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोपकर यांनी केल्याने वादाला तोंड फुटले आहे.

रामदास फुटाणे हे ग्रामीण भागातील कवी, लेखकांना बरोबर घेऊन चळवळ चालवत आहेत. आयोजकांच्या भूमिकेवरून त्यांनी तिरकस बाण सोडले आहेत. ‘आयोजकांची कल्पना चांगली असून हा नियम आधी महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, विदर्भ साहित्य संघ तसेच संलग्न संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांना लागू करावा. किती पदाधिकारी आणि साहित्यिक आनंदाने येतात हे कळेल. स्वखर्चाने आलेल्या मंडळींची पत्रिका तयार करावी. एकाला मानधन द्यायचे आणि एकाला नाही हे योग्य नाही. घटक संस्थेचे पदाधिकारी साहित्यिक नसतात तरीही ते हॉटेलमध्ये राहतात. त्यांनी आपआपल्या खर्चाने रहावे, तरच साहित्यिकांना सांगता येईल,’ अशी टिप्पणी फुटाणे यांनी केली.

लेखक व कवींना केविलवाणे का करता?
‘संमेलनात लेखकांची प्रतिष्ठा जपली पाहिजे. खेळाडू, कलाकार यांना त्यांच्या उत्सवात मानधन मिळते, तर मराठी भाषेच्या उत्सवात लेखक व कवींना केविलवाणे का करता? ग्रामीण भागातील कवी आले, तर त्यांचा पाच दिवस रोजगार बुडतो. काही जणांचे उत्पन्नाचे साधन साहित्य आहे. दर वर्षी २०० निमंत्रित लेखक व कवी असतात. यंदा शंभरने ही संख्या कमी झाल्याने तीन-चार लाखाच्या पुढे हा खर्च जाणार नाही. महामंडळाने महाकोषाच्या व्याजातून खणखणीत मानधन द्यावे. पदाधिकारी हे संस्थेसाठी कार्यरत असतात, त्यामुळे त्यांच्याशी तुलना करता येणार नाही,’ अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज