अ‍ॅपशहर

डॉक्टर ढकलताहेत स्ट्रेचर

ससून हॉस्पिटलमध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेकदा पेशंटना स्ट्रेचरवरून नेणे किंवा स्ट्रेचरवरून आलेल्या पेशंटला उचलून बेडवर ठेवण्याचे काम डॉक्टरांनाच करावे लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

Maharashtra Times 25 Mar 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, पुणे पश्चिम महाराष्ट्रातील ‘गरीबांचे हॉस्पिटल’ समजल्या जाणाऱ्या ससून हॉस्पिटलमध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेकदा पेशंटना स्ट्रेचरवरून नेणे किंवा स्ट्रेचरवरून आलेल्या पेशंटला उचलून बेडवर ठेवण्याचे काम डॉक्टरांनाच करावे लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. खासदार अनिल शिरोळे यांच्या अध्यक्षतेखाली ससून अभ्यागत मंडळाची पहिली बैठक झाली. त्या बैठकीत ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ही विदारक परिस्थिती शिरोळे यांच्यापुढे मांडली. त्या वेळी भाग्यश्री मंठाळकर, डॉ. शिशिर जोशी, डॉ. एन. पी. राव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे आदी उपस्थित होते. ससूनच्या समस्या मांडण्याबाबत उपस्थित डॉक्टरांना खासदार अनिल शिरोळे यांनी सूचना केली. ससून हॉस्पिटलमध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे अधिक आहेत. कर्मचारी नसल्यामुळे पेशंटचे स्थलांतर करणे, त्यांना वॉर्डात नेणे, बेडवर ठेवणे किंवा स्ट्रेचरवर ठेवणे यासारख्या कामासाठी वॉर्डबॉयसारखे कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे बहुतांश वेळा ही कामे निवासी डॉक्टरांनाच करावी लागत असल्याचे डॉक्टरांना सांगितले. रिक्त पदांची माहिती आपल्याला द्यावी, त्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन शिरोळे दिले. ससून हॉस्पिटलवर पेशंटचा ताण वाढत आहे. पेशंटना गुणवत्तापूर्ण उपचार देणे शक्य होत नाही. किरकोळ आजाराचे पेशंट पालिकेच्या दवाखान्यात पाठविल्यास ससून हॉस्पिटलमध्ये टर्शरी केअर उपचार देणे शक्य होईल, याकडे डॉ. शिशिर जोशी यांनी लक्ष वेधले. पालिकेच्या हद्दीतील किरकोळ आजाराच्या पेशंटना जर त्यांच्या दवाखान्यात उपचार मिळाले तर त्यांना ससूनमध्ये यावे लागणार नाही. तसेच औषधांसाठी ससूनमध्ये गर्दी करणाऱ्या पेशंटना पालिकेच्या इतर दवाखान्यात उपलब्ध झाली तर ससूनमध्ये गर्दी होणार नाही. गुणवत्तापूर्ण आणि टर्शरी केअर उपचार देता येईल, अशी भूमिका डॉक्टरांनी मांडली. ससून हॉस्पिटल आवारात स्वच्छता आढळत नाही. पेशंटसह नातेवाइकांना त्याचा त्रास होतो, याकडे शिरोळे यांनी हॉस्पिटल प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावर येत्या एक एप्रिलला ससून हॉस्पिटलमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय शिरोळे यांनी घेतला. हृदयविकाराच्या पेशंटसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेंटच्या किमती आदी विषयांवर पहिल्या बैठकीत चर्चा झाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज