अ‍ॅपशहर

बाजीरावांचा पुतळा उपेक्षितच

मराठी साम्राज्याचे अपराजित सेनानी थोरले बाजीराव पेशवे यांच्या शनिवारवाड्यासमोरील पूर्णाकृती पुतळ्याकडे पुणे महापालिकेचे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. पुतळ्याच्या चौथऱ्यावरील अनेक फरशा पडल्या असून, दुरुस्तीसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याचा पुण्याच्या कारभाऱ्यांनाही विसर पडला आहे.

Maharashtra Times 18 Aug 2017, 4:31 am
चौथऱ्यावरील फरशा उखडल्या; नामफलकाचीही दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम senior bajirao fisrt statue not proper in pune
बाजीरावांचा पुतळा उपेक्षितच


म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठी साम्राज्याचे अपराजित सेनानी थोरले बाजीराव पेशवे यांच्या शनिवारवाड्यासमोरील पूर्णाकृती पुतळ्याकडे पुणे महापालिकेचे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. पुतळ्याच्या चौथऱ्यावरील अनेक फरशा पडल्या असून, दुरुस्तीसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याचा पुण्याच्या कारभाऱ्यांनाही विसर पडला आहे.

पहिल्या बाजीराव पेशव्यांची आज, शुक्रवारी ३१७ वी जयंती आहे. मराठ्यांचे साम्राज्य उत्तरेत दिल्लीपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि अवघ्या ४० वर्षांच्या आयुष्यात एकाही लढाईत पराजित न झालेल्या बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याकडे लक्ष देण्यास पालिकेला वेळ नसल्याचे चित्र आहे. पुण्याची ओळख म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिवारवाड्यासमोरील मोकळ्या जागेत थोरल्या बाजीरावांचा पुतळा उभारण्यात आला आहे. परंतु, या पुतळ्याच्या चौथऱ्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या बाजीराव पेशव्यांच्या अतुलनीय वर्णनाचे फलक तुटक्या अवस्थेत आहेत. तसेच, बाजीरावांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या नामफलकाचीही दुरवस्था झाली आहे. बाजीरावांच्या पुतळ्याची देखभाल-दुरुस्ती वेळेवर केली जावी, यासाठी आतापर्यंत अनेकदा पालिकेकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, या चौथऱ्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा अवघा २०-२५ लाख रुपयांचा खर्च करण्याची पालिकेची मानसिकता नसल्याचे समोर येत आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर, देशाच्या कानाकोपऱ्यातून पुण्यात येऊन शनिवारवाड्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही वाढ झाली होती. शनिवारवाड्याची माहिती त्यांना मिळत असली, तरी बाजीराव पेशव्यांची माहिती देणाऱ्या फलकांची दुर्दशा झाल्याचे आढळून आले. त्याची डागडुजी करण्याची मागणी पुण्यातून अनेकांनी पालिकेकडे केली. तरीही, त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. या पुतळ्याच्या दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव महापालिकेने तयार केल्याचे सांगितले जात असले, तरी तो स्थायी समितीच्या मान्यतेसाठी आतापर्यंत सादर का झाला नाही, याचे उत्तर देण्यात येत नाही.

महापौरांचेही होतेय दुर्लक्ष

पालिका निवडणुकीपूर्वी शनिवारवाड्याच्या प्रांगणामध्ये दीडशे फुटी राष्ट्रध्वजाचे अनावरण करण्यात आले होते. त्यासाठी, कोट्यवधी रुपये खर्च झाले असले, तरी त्याच ठिकाणी असणाऱ्या बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता असल्याचे कारण पालिकेने पुढे केले होते. नव्या प्रभागरचनेमुळे शनिवारवाड्याचा भाग आता महापौर मुक्ता टिळक यांच्या प्रभागात येत असून, त्यांच्यासह उर्वरित तिन्ही नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे, बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या दुरुस्तीसाठी यंदा तरी निधी मिळणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज