अ‍ॅपशहर

अफझलखानाला मुस्लिम म्हणून मारलं नाही: पवार

'छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हते. अफझलखानाला त्यांनी मुस्लिम म्हणून नव्हे तर स्वराज्याचा शत्रू म्हणून मारले होते,' असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

Maharashtra Times 21 Jun 2017, 3:20 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivaji maharaj was not anti muslim says sharad pawar
अफझलखानाला मुस्लिम म्हणून मारलं नाही: पवार


'छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हते. अफझलखानाला त्यांनी मुस्लिम म्हणून नव्हे तर स्वराज्याचा शत्रू म्हणून मारले होते,' असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

महात्मा फुले इतिहास अकादमीच्या माध्यमातून श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या सचित्र चरित्राचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ, डॉ. जयसिंगराव पवार, पी. ए. इनामदार आणि प्रवीण गायकवाड यावेळी उपस्थित होते. ‘गो ब्राह्मणप्रतिपालक’ अशा वर्णनाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सध्याच्या तरुणांवर लादण्याचा प्रकार सुरू आहे. असा अ-नैतिहासिक इतिहास अस्वस्थ करणारा असून, रयतेचे राजे असलेल्या महाराजांच्या वास्तव इतिहासाची मांडणी कोकाटे यांच्या पुस्तकातूनच होत आहे’, असं पवार म्हणाले. तसंच, कोकाटे यांनी मांडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वास्तवदर्शी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवा, शाळा-शाळांमध्ये न्या, असं आवाहन त्यांनी केलं.

'महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांना 'कुळवाडी भूषण' ही उपाधी दिली होती. मात्र, नंतर त्यांना 'गो-ब्राह्मणप्रतिपालक' ठरवण्यात आलं. प्रत्यक्षात तसं नाही. राज्य चालविताना महाराजांनी सर्वांचा विचार केला, सर्वांना सोबत घेतले. त्यांच्या सैन्यदलातही अनेक मुस्लिमांचा भरणा होता. तरीही, महाराजांनी फक्त मुस्लिमांविरोधात लढा उभारला, हे सांगितले जाते ते खरे नाही. स्वराज्याला आडवा येणाऱ्याचा नाश करण्याची त्यांची भूमिका होती. ते करताना त्यांनी हिंदू, मुस्लिम किंवा नातीगोती पाहिली नाहीत. अन्यथा, अफझलखानाचा वकील असलेला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वाचला असता, असं पवार म्हणाले.

'मुस्लिमांसह इंग्रज, पोर्तुगीज आणि अन्याय, अत्याचार करणाऱ्या इतर परकीय शक्तींविरोधात त्यांनी संघर्ष केला. सज्जनांचे संरक्षण आणि दुर्जनांचा नाश या तत्त्वाने अठरापगड जातींना संघटित करून महाराज लढत राहिले. त्यामुळे, त्यांचे राज्य ‘भोसल्यांचे राज्य’ म्हणून नाही, तर रयतेचे राज्य म्हणून नावारुपाला आले’, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज