अ‍ॅपशहर

एकमेकांना भेटले, गप्पा झाल्या; पण राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात- माझा आढळरावांना विरोधच

Pune Politics: शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं होतं. मात्र, माझा आढळरावांना विरोधच असेल असं मोहिते पाटील यांनी स्पष्ट करत ही भेट राजकीय नसल्याचं सांगितलं.

| Edited byनुपूर उप्पल | Lipi 10 Mar 2024, 3:11 pm
पुणे : शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मात्र ही भेट राजकीय नसून मैत्रीपूर्ण होती. त्यामुळे आमची भेट झाली असली तरी माझा आढळराव पाटील यांना विरोध कायम असल्याची भूमिका आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी बोलून दाखवली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune news (2)


खेड येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर आढळराव पाटील यांनी भेटीचे फोटो शेअर केले आहेत. त्यावर दिलीप मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी मोहिते पाटील म्हणाले की, शिवाजीराव आढळराव पाटील आणि माझे मतेभद अगदी टोकाचे आहेत. शिवाजीराव मला उमेदवार म्हणून भेटीला आलेले नाहीत. निवडणुकीला मला मदत करा असे देखील ते म्हणाले नाहीत. आता उमेदवारी मिळेल अशी शक्यता असल्याने त्यांनी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, उत्तर पुणे जिल्ह्यात उमेदवारीबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार दिलीप वळसे पाटील यांना आहेत. त्यामुळे एखाद्याला उमेदवारी देण्याअगोदर त्याने पक्षात राहून काम करणे गरजेचे आहे. ऐनवेळी उमेदवार उभा केला तर निवडून येत नाही. याबाबत मला पक्षाकडून सतत डावललं गेलं आहे, अशी खंत देखील मोहिते पाटील यांनी बोलून दाखवली आहे. जर मला पक्षाने मला त्यांच्या निवडणुकीचा प्रचार करण्यास सांगितले तर मी राजकारण सोडून घरी बसेन असे देखील मोहिते पाटील म्हणालेत.

लोकसभा निवडणूक सध्या जोर धरू लागली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदार संघाची चर्चा जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार यांनी उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. त्यात शिवाजीराव आढलराव पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, आढळराव यांना पक्षात घेण्यास स्थानिक आमदारांनी विरोध केला आहे. त्यात खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि माजी आमदार विलास लांडे यांनी देखील विरोध केला आहे.

मी जो संघर्ष केला त्याच काय ?


गेली पंधरा वर्ष मी ज्यांच्या विरोधात संघर्ष केला त्यांच्यासोबत काम करायचं किंवा त्यांचा प्रचार करायचा झाल्यास मी राजकारण सोडून घरी बसेन. मी जे काही भोगले आहे ते मी कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या येण्याला माझा नेहमीच विरोध असणार आहे.

महत्वाचे लेख