अ‍ॅपशहर

सबनीसांची कारकीर्द शब्दबद्ध

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची गाजलेली अध्यक्षीय कारकीर्द शब्दबद्ध झाली आहे.

Maharashtra Times 6 Dec 2016, 3:00 am
वर्षभरातील कार्यक्रम, भाषणांचे संकलन पुस्तकरूपात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shripal sabnis speeches publish in book
सबनीसांची कारकीर्द शब्दबद्ध


म. टा. प्रतिनिधी, पुणे
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची गाजलेली अध्यक्षीय कारकीर्द शब्दबद्ध झाली आहे. सबनीस यांच्या वर्षभराच्या कारकिर्दीवर पुस्तक तयार करण्यात आले असून वर्षभरातील घडामोडींचा आढावा त्यात घेण्यात आला आहे. अध्यक्षीय भाषणाबरोबरच विविध ठिकाणे झालेली भाषणे व लेख या पुस्तकातून वाचायला मिळणार आहेत. संमेलनाध्यक्षांच्या वर्षभराच्या कालावधीवर पुस्तक निघण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वक्तव्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले डॉ. सबनीस यांनी आपल्या सडेतोड भाषणाने व मुलाखतीने पिंपरी येथे झालेले ८९वे साहित्य संमेलन गाजवले. तसेच पुढे वर्षभर ते सतत चर्चेत राहिले. सबनीस यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीला वर्ष पूर्ण होत असताना अवघा महाराष्ट्र त्यांनी कार्यक्रम व गाठी-भेटीच्या निमित्ताने पालथा घातला आहे. राज्याच्या दुर्गम भागातही जाऊन ते आपली भूमिका अधिक जोरकसपण मांडत राहिल्याने बऱ्याचदा वादही निर्माण झाले. त्यांचे वर्षभराचे हे ‘साहित्य संचित’ पुस्तकरूपाने एकत्रित करण्यात आले आहे.

वर्डस्म‌िथ प्रकाशन संस्थेतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या ‘मानदंडात्मक संमेलनाध्यक्ष : डॉ. श्रीपाल सबनीस’ या पुस्तकाचे संपादन सचिन इटकर, महेश थोरवे व उद्धव कानडे यांनी केले आहे. १० डिसेंबरला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. पिंपरीच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील या वेळी उपस्थित राहणार आहेत. नवी पेठेतील संकल्प कार्यालयात सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. साहित्यप्रेमींचा स्नेहमेळावा यानिमित्ताने होणार आहे.

‘साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वर्षभरातील घडामोडींचे संकलन व्हावे, या हेतूने हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये साहित्य महामंडळाने न छापलेले डॉ. सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण, संमेलनातील मुलाखतीसह विविध ठिकाणी झालेल्या मुलाखती, बातम्या, वृत्तपत्रांचे अग्रलेख, विविध लेख, नियतकालिकांमधील लेख, पुढे काय करणार याबाबत डॉ. सबनीस यांचा लेख अशा प्रकारचे हे संकलन असेल,’ असे इटकर यांनी ‘मटा’ला सांगितले.

डॉ. सबनीस यांचे वर्षभरात सुमारे ३०० कार्यक्रम झाले असून तेथील अनुभव, धमक्या, वाद, पोलिस संरक्षणातील अध्यक्ष असे सारे यंदा प्रथमच घडले आहे. याची नोंद पुस्तकात घेण्यात आली आहे. ३०० कार्यक्रमांची सविस्तर नोंद पुस्तकात असेल. हे पुस्तक भेट म्हणून देण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज