पुणे : आमदार अनंत गाडगीळ यांनी स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या आमदार निधीतून पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) एक सीएनजी मिडी बस खरेदी केली आहे. या बसचे लोकार्पण आमदार गाडगीळ यांच्या हस्ते नुकतेच झाले.
या वेळी पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, संचालक शंकर पवार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. गाडगीळ यांच्या आमदार निधीतून यापूर्वीही एक मिडी बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. पीएमपी बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या महिलांच्या टोळीस शिताफीने पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या महिला वाहक माधवी लांडगे यांचाही या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला.