अ‍ॅपशहर

‘लेसर’ऐवजी एलईडी दिवे

चेहऱ्यावर आलेले मुरूम, व्रण, तसेच खड्डे भरून काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक लेसर उपचाराच्या नावाखाली चक्क एलईडी दिव्यांचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्वचेच्या आजारानुसार कोणत्या प्रकारचे लेसर वापरावे याचे पुरेसे ज्ञान नसल्याने त्वचा जळणे, चेहरा खराब होण्याचे प्रकार घडले आहेत.

Maharashtra Times 24 May 2016, 4:38 am
चेहऱ्यावर व्रण, मुरूम असणाऱ्या पेशंटची सर्रास फसवणूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम skin specialist pune dermatology patient hospital
‘लेसर’ऐवजी एलईडी दिवे

Mustafa.Attar@timesgroup.com
पुणे : चेहऱ्यावर आलेले मुरूम, व्रण, तसेच खड्डे भरून काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक लेसर उपचाराच्या नावाखाली चक्क एलईडी दिव्यांचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्वचेच्या आजारानुसार कोणत्या प्रकारचे लेसर वापरावे याचे पुरेसे ज्ञान नसल्याने त्वचा जळणे, चेहरा खराब होण्याचे प्रकार घडले आहेत.
‘सध्या सर्वत्र लेसरद्वारे उपचाराच्या जाहिराती पाहायला मिळतात. एकच लेसरचे तंत्र सर्व आजारावर उपयोगी ठरत नाही. मुरूम, खड्डे, जन्मखुणा, काळे डाग, गोंदण, जन्मापासून लालसर रक्ताचे डाग, चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी विविध प्रकारच्या लेसर उपचारांची गरज असते. परंतु, अनेकदा ब्युटी पार्लरमध्ये लेसर मशिनऐवजी चेहऱ्यावरील डाग, खड्डे, मुरूम काढण्यासाठी इंटेन्स पर्ल्स लाइट अर्थात आयपीएलसारख्या एलईडी दिव्यांचा वापर करण्यात येतो,’ अशी माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शरद मुतालिक यांनी ‘मटा’ला दिली. लेसर उपचारासाठी महागड्या मशिनचा अवलंब करण्यात येतो. मात्र, किमतीमुळे त्या मोठ्या हॉस्पिटलशिवाय कोणालाही विकत घेणे परवडत नाही. त्यासाठी उपचारांचे स्वतंत्र पॅकेज असतात. परंतु, लेसर उपचारासाठी त्वचारोग तज्ज्ञ प्रशिक्षित असतीलच असे नाही. कंपनीकडून दिले जाणारे एका दिवसाचे प्रशिक्षण पुरेसे नसते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
‘त्वचेचे कोणतेही आजार शंभर टक्के बरे होतील, असे आम्ही कधी सांगत नाही. त्वचारोगाचे ज्ञान नसलेले तसेच अननुभवी तंत्रज्ञांकडून जादा क्षमतेच्या लेसरचा वापर केला जातो. चुकीच्या निकषांच्या आधारे चुकीचे निदान करून चुकीचे उपचार त्यांच्याकडून केले जातात. त्यामुळे चेहरा जळणे, कायमस्वरूपी डाग पडणे, त्वचा जळणे असे प्रकार घडतात. त्वचेचे उपचार एका दिवसात बरे होत नाहीत. महिना अथवा दोन महिन्यातून एकदा त्वचारोग तज्ज्ञांकडे जावेच लागते. असे दहा ते बारा वेळा उपचार घ्यावे लागतात. उपचारानुसार दहा हजार ते दीड लाख रुपयापर्यंत खर्च येतो. ब्युटीपार्लर अथवा त्वचातज्ज्ञ नसलेले पण इतर पॅथीची मंडळी असे उपचार करतात. त्यामुळे पेशंटची आर्थिक फसवणूक होते. चामखीळ काढण्यासाठी इलेक्ट्रो कॉटरी नावाच्या तंत्राचा लेसरच्या नावाखाली वापर होतो,’ असे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नील शहा यांनी सांगितले.
..
जादा क्षमतेच्या लेसरचा वापर केल्याने चेहऱ्यावरील व्रण खराब होतात. पिंपल्सचे फोड बरे व्हायच्या आधीच लेसर वापरल्याने भाजल्याचे व्रण पडतात. त्यातून अनेकांचे चेहरे खराब झाले आहेत.
डॉ. शरद मुतालिक, त्वचारोग तज्ज्ञ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज