अ‍ॅपशहर

सिटीचा ‘स्मार्ट’ कारभार

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी स्पर्धेत संपूर्ण देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पुणे शहराचा कारभार ‘स्मार्ट’ होण्याची अपेक्षा असतानाच, ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ (पीएससीडीसी) या कंपनीसाठी स्वतंत्र ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ (सीईओ) नेमण्याबाबत चालढकल केली जात आहे.

Maharashtra Times 27 Sep 2016, 4:17 am
‘पीएससीडीसी’ सीईओचे पद १२० दिवसांनंतरही रिक्तच; अतिरिक्त आयुक्तांवर भार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम smart cities ceo post vacant since 2 years
सिटीचा ‘स्मार्ट’ कारभार


Suneet.Bhave@timesgroup.com
............
Tweet : @suneetMT

पुणे : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी स्पर्धेत संपूर्ण देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पुणे शहराचा कारभार ‘स्मार्ट’ होण्याची अपेक्षा असतानाच, ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ (पीएससीडीसी) या कंपनीसाठी स्वतंत्र ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ (सीईओ) नेमण्याबाबत चालढकल केली जात आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांवरच सध्या ‘पीएससीडीसी’ची जबाबदारी असून, ६० दिवसांत ‘सीईओ’ पद भरले जाण्याची घोषणा १२० दिवसांनंतरही अद्याप हवेत आहे. स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी ‘पीएससीडीसी’ ही स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली. कंपनीमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना आणि त्यावर दैनंदिन देखरेख करण्याचे काम ‘सीईओ’तर्फे केले जाणे अपेक्षित आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही जबाबदारी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (विशेष) प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे देण्यात आली होती. त्याचवेळी सीईओपदाचा कार्यभार देशभ्रतार यांच्याकडे ६० दिवसांसाठीच असेल आणि या मुदतीमध्ये कंपनीसाठी स्वतंत्र सीईओ नियुक्त केला जाईल, असा ठराव संचालक मंडळाने एप्रिलमध्ये पहिल्या बैठकीत केला होता. दुर्दैवाने, १२० दिवस उलटून गेले, तरी परिस्थिती ‘जैसे थे’च असून, नवीन सीईओ नियुक्त करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. यापूर्वीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत महापालिकेचे विरोधी पक्षनेते आणि कंपनीचे संचालक अरविंद शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी, लवकरच ही प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. कंपनीने विविध विभागांसाठी अधिकारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली; पण सीईओ पदासाठीची जाहिरात अजून देण्यात आलेली नाही.
केंद्र सरकारने स्मार्ट सिटीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ‘सीईओ’ हा प्रामुख्याने आएएस दर्जाचा अधिकारी असावा, असे यापूर्वीच स्पष्ट केले होते. तसेच, त्याची नियुक्ती करताना, केंद्र सरकारशी सल्लामसलत करण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले होते.
...............
सीईओ पदाचा कार्यभारही आयुक्तांकडे?
स्मार्ट सिटी कंपनीची स्थापना झाली, तेव्हा महापालिका आयुक्त त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर, राज्य सरकारने अध्यक्षपदावरून त्यांची उचलबांगडी करून नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. डॉ. करीर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली असली, तरी स्मार्ट सिटीचे सर्व दैनंदिन कामावर देखरेख आणि पाठपुरावा आयुक्तांमार्फतच केला जात आहे. सध्या महापालिका आयुक्त पदासह कुमार हे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) प्रभारी अध्यक्ष आहेत. त्यामुळे, आता त्यांच्याकडेच स्मार्ट सिटीच्या ‘सीईओ’चाही अतिरिक्त कार्यभार दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
.........................
स्मार्ट सिटीचे सर्व काम महापालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फतच सुरू आहे. म्हणजे, स्मार्ट सिटीची कामे महापालिका करणार आणि त्याचे श्रेय मात्र केंद्र सरकार घेणार, हे चुकीचे आहे. सीईओची नियुक्ती केली जावी, अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
अरविंद शिंदे
विरोधी पक्षनेते, संचालक, पीएससीडीसी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज