अ‍ॅपशहर

नोटाबंदीने राज्याचे मुद्रांक शुल्क घटले

नोटाबंदीचा फटका नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला बसला असून, या विभागाला मिळणाऱ्या महसुलात सुमारे एक हजार कोटी रुपयांची घट झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.

Maharashtra Times 17 Feb 2017, 3:00 am
राज्य सरकारला हजार कोटींचा फटका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम stamp duty decrease by one thousand crore in maharashtra
नोटाबंदीने राज्याचे मुद्रांक शुल्क घटले


म. टा. प्रतिनिधी, पुणे
नोटाबंदीचा फटका नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला बसला असून, या विभागाला मिळणाऱ्या महसुलात सुमारे एक हजार कोटी रुपयांची घट झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. या विभागाकडे गेल्या वर्षी जानेवारी महिन्याअखेरीस सुमारे १७ हजार २४४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. यावर्षी सुमारे १६ हजार ८६२ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला आहे.

राज्यामध्ये दरवर्षी सर्वांत जास्त महसूल नोंदणी आणि मुंद्राक शुल्क विभागात जमा होत असतो. मात्र, केंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर या विभागातील महसुलावर परिणाम झाला आहे. सर्व प्रकारच्या दस्त नोंदणीचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी झाले आहे.

या विभागाच्या लातूर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती या विभागांतील दस्त नोंदणी अनुक्रमे चार, दोन आणि १३ टक्क्यांनी कमी झाली आहे. पुणे, मुंबई आणि ठाणे या विभागांमध्ये अनुक्रमे सुमारे दोन, नऊ आणि सात टक्क्यांनी अधिक दस्तनोंदणी होत आहे. पुण्यात रोज सुमारे एक हजार ७४८ दस्तांची नोंद होत आहे. यापूर्वी सरासरी एक हजार ७१५ दस्त नोंदविले जात होते. मुंबईत पूर्वी सरासरी ६०६ दस्त नोंदले जात होते. ते प्रमाण आता ६४६ झाले आहे. ठाण्यातही प्रमाण वाढत असून, रोज सुमारे एक हजार १४४ दस्तांची नोंदणी होत आहे. पूर्वी एक हजार ४७ दस्त नोंदण्याचे​ प्रमाण होते.

दस्त नोंदणीद्वारे राज्यात रोज सुमारे ६२ कोटी रुपयांचा महसूल विभागाकडे जमा होत असे. आता राज्यात सरासरी दस्तनोंदणी कमी झाल्यामुळे रोज सुमारे ४२ कोटी जमा होत आहेत. याबाबत नोंदणी महानिरीक्षक एन. रामस्वामी म्हणाले, ‘महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध मोहिमा राबविण्यात येणार आहेत. कर चुकविणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.’

‘या विभागाला सुमारे २३ हजार ५४८ कोटी रुपये महसुलाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महसुलाबाबत राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. त्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणाऱ्या मालमत्तेवरील सुमारे १५०० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे सुचवले आहे. त्यामुळे महसुली तोटा भरून काढता येणार आहे. खाण उद्योगाशी संबंधित महसूल मोठ्या प्रमाणात थकीत आहे.’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज