अ‍ॅपशहर

विदर्भ अनुशेषाला सरकारे कारणीभूत

‘वेगळ्या विदर्भाची मागणी ही मंत्री होण्याची इच्छा असणाऱ्यांची आणि भांडवलदारांची आहे; विदर्भातील श्रमिक, आदिवासी आणि शेतकऱ्यांची नाही. विदर्भाचा अनुशेष राहण्यास आजपर्यंतची राज्य सरकारे जबाबदार असून, तो भरून काढण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसण्यास तयार आहे,’ असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.

Maharashtra Times 6 Aug 2016, 4:42 am
संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्र​तिपादन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम state governments responsible for backwardness of viadhrbha
विदर्भ अनुशेषाला सरकारे कारणीभूत


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘वेगळ्या विदर्भाची मागणी ही मंत्री होण्याची इच्छा असणाऱ्यांची आणि भांडवलदारांची आहे; विदर्भातील श्रमिक, आदिवासी आणि शेतकऱ्यांची नाही. विदर्भाचा अनुशेष राहण्यास आजपर्यंतची राज्य सरकारे जबाबदार असून, तो भरून काढण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसण्यास तयार आहे,’ असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.

आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने ‘संयुक्त महाराष्ट्र’ या विषयावर सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेनेचे शहर संघटक श्याम देशपांडे, कॉम्रेड अजित अभ्यंकर, टेक्सास गायकवाड आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबुराव कानडे उपस्थित होते.
‘भाजपचा छोटी राज्य निर्माण करण्याचा उघड अजेंडा आहे. हा अजेंडा घटनाविरोधी आहे. स्वतंत्र विदर्भ करण्याऐवजी विदर्भाचा अनुशेष भरून काढावा. विदर्भाचा अनुशेष राहण्यास आतापर्यंतची राज्य सरकारे जबाबदार आहेत. आता विकासामध्ये विदर्भाला झुकते माप देण्याची भूमिका घेतली पाहिजे. या मागणीसाठी उपोषणाला बसण्यास तयार आहे,’ असेही ते म्हणाले. अखंड महाराष्ट्रासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करावी, अशी सूचनाही त्यांनी मांडली.

‘संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेकांनी रक्त सांडले आहे, हे विसरून चालणार नाही. त्याचबरोबर विदर्भातील लोकांच्या वेदना लक्षात घेतल्या पाहिजेत. वेदनामुक्त अखंड महाराष्ट्र होण्याची गरज आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. ‘विदर्भातील लोक आळशी आहेत,’ अशी टीका काकडे यांनी केली. ते म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्राने अन्याय केल्याची ओरड केली जाते. मात्र, विदर्भातील लोकांनीही फारसे काही केले नाही. विदर्भात सहकार चळवळ वाढली नाही. विदर्भाचा निधी हा पश्चिम महाराष्ट्राने कधीही घेतला नाही.’
‘विदर्भात जोडधंदे कमी आहेत. याचा विचार झाला पहिजे.’ असे देशपांडे यांनी नमूद केले. स्वतंत्र विदर्भ केल्यास महसूल कोठून येणार, असा सवाल अभ्यंकर यांनी केला. ते म्हणाले, ‘खनिज संपत्तीवर राज्य चालवणे, हा भ्रम आहे.’ गायकवाड आणि कानडे यांनीही वेगळ्या विदर्भाच्या मागणीला विरोध दर्शवला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज