अ‍ॅपशहर

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ही स्वप्नपूर्ती

'नवभारत घडविणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांची दृढनिश्चयता, खंबीरपणा, अंगभूत चातुर्य, काहीसा अबोलपणा स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या रूपाने साकारण्यात आला आहे. सरदार सरोवराचा विस्तीर्ण जलायश आणि निरभ्र आकाशाच्या पार्श्वभूमीवर उभे राहिलेले पटेलांचे स्मारक हीच खरी स्वप्नपूर्ती!

Maharashtra Times 29 Oct 2018, 2:18 am
Varad.Pathak@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम statue-of-unity


Tweet : @VaradPathak_MT

पुणे : 'नवभारत घडविणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांची दृढनिश्चयता, खंबीरपणा, अंगभूत चातुर्य, काहीसा अबोलपणा स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या रूपाने साकारण्यात आला आहे. सरदार सरोवराचा विस्तीर्ण जलायश आणि निरभ्र आकाशाच्या पार्श्वभूमीवर उभे राहिलेले पटेलांचे स्मारक हीच खरी स्वप्नपूर्ती! माझ्या हातून झालेल्या या कामाचा आनंद शब्दांत कसा सांगू,' अशा विनम्र भावना या स्मारकाचे संकल्पनाचित्र मांडणाऱ्या प्रभाकर एम. कोल्हटकर यांनी व्यक्त केल्या.

गुजरातमधील सरदार सरोवरात जगातील सर्वांत भव्य अशा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' स्मारकाचे उद्घाटन येत्या बुधवारी (३१ ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्या पार्श्वभूमीवर 'मटा'ने प्रभाकर कोल्हटकरांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी आपल्या भावना मांडल्या. कोल्हटकर दिल्लीत ३३ वर्षे नगर नियोजनकार म्हणून कार्यरत होते. निवृत्तीनंतर ते प्रारंभी बडोदा आणि नंतर पुण्यात स्थायिक झाले. गुजरातची आणि महानायक सरदार पटेलांबद्दलची ओढ कायम होती. त्याबद्दल ते म्हणाले, 'माझे वडील म. का. कोल्हटकर आणि बंधू गोविंद कोल्हटकर हे जागतिक दर्जाचे शिल्पकार होते. वडिलांनी सरदार पटेलांची तीन शिल्पे रेखाटली होती. त्यामुळे त्यांचे भव्य स्मारक असावे, अशी माझी भावना होती. सरदार सरोवराला भेट दिली, त्या वेळी या स्मारकाची कल्पना स्फुरली.'

रॉक स्कल्प्चरपासून विविध प्रकारांची चाचपणी, पुतळ्याची इमारत, लिफ्ट यांचे स्केचेस तयार करून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ई-मेलद्वारे पाठविले. त्यानंतर आठ दिवसांनी मोदींच्या कार्यालयातून भेटायचा निरोप आला. त्यानुसार मी आणि माझे जावई डॉ. विभास मोडक यांच्यासोबत मोदींची भेट घेऊन स्मारकाचे संकल्पनाचित्र सादर केले. पंधरा मिनिटांची ही नियोजित बैठक तब्बल ४२ मिनिटे चालली अन् 'कोल्हटकरजी, हे स्मारक होणार अन् इथेच होणार' अशा शब्दांत मोदींनी स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तब्बल आठ बैठका झाल्या. मोदींची कुशल हाताळणी आणि शिस्तबद्ध सरकारी यंत्रणेच्या जोरावर हे स्मारक वेळेत उभे राहिल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.

रायगडाचाही विचार सुरू

'स्टॅच्यू ऑफ युनिटी' स्मारकाचे काम भव्यत्वाची अनुभूती देणारे होते, आता पुढील काम दिव्यत्वाची प्रचिती देणारे असेल. असा प्रकल्प महाराष्ट्राच्या भूमीवरही तयार व्हावा, यासाठी रायगडचा विचार सुरू असल्याचे सूतोवाच प्रभाकर कोल्हटकर यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज