म. टा. प्रतिनिधी, पुणे
माजी आमदार विनायक निम्हण यांचे चिरंजीव माजी नगरसेवक सनी यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश निश्चित झाला आहे. सनी मंगळवारी मुंबईतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
विनायक निम्हण या वेळीही शिवसेनेकडून विधानसभा लढण्यास इच्छुक होते. मात्र, हा मतदारसंघ शिवसेनाला न सुटल्याने निम्हण यांच्या भाजपप्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सनी यांचा भाजपप्रवेश होत आहे. भाजपच्या 'संकल्प पत्रा'चे वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात प्रकाशन करण्यात येत आहे. या वेळी सनी यांच्यासह एका विधानपरिषदेवरील आमदाराचा भाजपप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सनी यांचा भाजपप्रवेश असला तरी विनायक निम्हण हे लगेचच भाजपमध्ये जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
'बाणेर-बालेवाडी-औंध तसेच पाषाण या परिसराच्या विकासासाठी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी सरकार हे युतीचेच असेल त्यामुळे या परिसराच्या विकासाला अधिक चालना देण्यासाठी भाजप हाच सक्षम पर्याय आहे,' असे सनी निम्हण म्हणाले.
................