अ‍ॅपशहर

दिवाळीत जपा मुलांचे आरोग्य

दिवाळी आणि फटाके हे समीकरणच आहे. अगदी आपण फटाके नाही उडवले, तरी आजूबाजूला फटाके उडवले जाणारच. लहान बाळांना फटाक्यांच्या आवाज आणि धुरापासून जमेल तितके दूरच ठेवणे योग्य. मोठ्या मुलांच्या कानावर काही प्रमाणात फटाक्यांचा आवाज पडला, तर लगेच त्रास होतो असे नाही. परंतु फटाक्यांमुळे भाजणे टाळण्यासाठी काळजी घ्यायला हवी, तसेच फार मोठ्या आवाजाचे फटाके टाळलेले बरे.

Maharashtra Times 17 Oct 2017, 7:07 pm
डॉ. अमिता फडणीस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम take care of childrens health in diwali
दिवाळीत जपा मुलांचे आरोग्य

दिवाळी आणि फटाके हे समीकरणच आहे. अगदी आपण फटाके नाही उडवले, तरी आजूबाजूला फटाके उडवले जाणारच.
लहान बाळांना फटाक्यांच्या आवाज आणि धुरापासून जमेल तितके दूरच ठेवणे योग्य.
मोठ्या मुलांच्या कानावर काही प्रमाणात फटाक्यांचा आवाज पडला, तर लगेच त्रास होतो असे नाही. परंतु फटाक्यांमुळे भाजणे टाळण्यासाठी काळजी घ्यायला हवी, तसेच फार मोठ्या आवाजाचे फटाके टाळलेले बरे.
ज्या मुलांना धुरामुळे पटकन खोकला होतो त्यांना मात्र शक्यतो फटाके न उडवण्यासाठी समजावून सांगायला हवे. नीट समजावल्यास मोठी मुले नक्की ऐकतील. दमा किंवा अलर्जिक खोकल्याचा त्रास असलेल्या मुलांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होणे किंवा खूप खोकला होणे अशी लक्षणे दिसू शकतात. अशा मुलांची काळजी घेण्याबाबत आपल्या डॉक्टरांशी बोलून घेणे आवश्यक आहे. काही वेळा या मुलांसाठी इन्हेलर किंवा नेब्यूलायझरचा वापर करण्यास सुचवले जाते. ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरावे.

मुलांसाठी तेल किंवा उटणे वापरताना ते आधी मुलांच्या त्वचेच्या छोट्या भागावर लावून पाहावे आणि काही त्रास होत नाही याची खात्री करून मगच वापरावे.

दिवाळी म्हटल्यावर नवीन कपडे आलेच. लहान बाळांना मात्र त्यांच्या नाजूक त्वचेचा विचार करून सुती कपडेच घालावेत. सिंथेटिक कापडाचे कपडे घालायचेच असतील, तर ते थोडा वेळच घालावेत. काही बाळांना सिंथेटिक कापडाचे कपडे त्वचेला घासून पुरळ येते.

गोड पदार्थांशिवाय दिवाळी पूर्णच होऊ शकणार नाही. मुलांना गोड खायला जरूर द्यावे, पण खाताना कुठे थांबायचे याची सवय लहानपणापासूनच लावायला हवी. गोड पदार्थ नेहमीच मर्यादित प्रमाणातच खाणे इष्ट. कारण गोडाची सवय लागू शकते आणि ती आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक
ठरू शकते.

दिवाळी आली तरी रोज पडणारा पाऊस, अधूमधून कडक ऊन आणि संध्याकाळी व रात्री हवेत जाणवणारा गारवा, अशा वातावरणात हवेतील संसर्गकारक जंतू वाढतात. सर्दी, खोकला, ताप आणि काही प्रमाणात न्यूमोनिया हे या वातावरणातील प्रमुख आजार. विषाणूजन्य आजार झाल्यावर चटकन बरे न होता थोडे रेंगाळत असल्याचेही बघायला मिळते आहे. तसेच सध्या हात, पाय आणि तोंडावर पुरळ व खाज येऊन ताप येण्याचे लक्षण दिसणारा ‘हँड, फूट अँड माऊथ डिसीज’देखील लहान मुलांमध्ये दिसतो आहे.

लहान मुलांना संसर्गजन्य आजारांपासून दूर ठेवण्यासाठी चांगला प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे लहानपणापासून डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेले लसीकरण. विषाणूजन्य आजारांचा संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता राखणे, वेळोवेळी साबण व पाण्याने हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. बाहेर फिरताना ‘हँड सॅनिटायझर’देखील वापरता येईल. पण त्यातही रसायने असल्यामुळे साबण आणि पाण्याने हात धुण्याचा उपाय सर्वांत चांगला. विषाणूजन्य आजार झाल्यावर डॉक्टरांकडून लवकर तपासणी करून घेणे आणि आजाराची खात्री करून घेणे चांगले. अशा आजारांमध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण चांगले राखणे आवश्यक असते. साधे पाणी, शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबत, ‘ओआरएस’चे पाणी अशी घरगुती पेये मुलांना मोजमाप करून आठवणीने द्यावीत. त्याने आजार लवकर बरा होण्यास नक्कीच मदत होईल.
(लेखिका बालरोगतज्ज्ञ आहेत.)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज