अ‍ॅपशहर

मोबाइल आणि इलेक्ट्रिक वस्तूंची बाजारपेठ

घाऊक बाजारातील दरात मोबाइल आणि त्यासंबंधित वस्तू तसेच म्युझिक सिस्टीम, सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची पावले तपकीर गल्लीकडे हमखास वळतात.

Authored byचिंतामणी पत्की | महाराष्ट्र टाइम्स 1 Jun 2021, 4:01 pm
पुणे : घाऊक बाजारातील दरात मोबाइल आणि त्यासंबंधित वस्तू तसेच म्युझिक सिस्टीम, सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची पावले तपकीर गल्लीकडे हमखास वळतात. तपकीर गल्ली कुठे आहे, असे विचारले, तर अनेकांना सांगता येणार नाही; पण 'बुधवार पेठेतील मोबाइलचे मार्केट' असे म्हटले की लगेच लक्षात येईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tapkir galli budhwar peth in pune is famous for mobile and electric goods
मोबाइल आणि इलेक्ट्रिक वस्तूंची बाजारपेठ


फडके हौदाकडून वसंत टॉकीजकडे जाण्यासाठीचा जवळचा मार्ग अशी खूण जुन्या पिढीतील पुणेकरांना माहिती आहे. छोटासा बोळ आणि जुने वाडे असलेल्या या गल्लीत तपकीर बनविण्याचा मोठा कारखाना होता. त्यावरून तपकीर गल्ली नाव पडले. मात्र, आज येथे हा कारखाना अस्तित्वात नाही.

पूर्वी येथे केवळ बल्ब, ट्यूबलाइट, वायर, स्वीच अशा काही ठरावीक वस्तू येथे मिळत. सिंग लाइट हाउस, मेट्रो इलेक्ट्रिकल्स, सिटीझन इलेक्ट्रिकल्स, प्रभात एजन्सी अशी काही दुकाने पूर्वी येथे होती. हळूहळू येथे इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाइलशी संबंधित अनेक वस्तू विकल्या जाऊ लागल्याने ही बाजारपेठ विस्तारत गेली. फडके हौद, जिजामाता उद्यान, बुधवार चौक ते पासोड्या विठोबा मंदिर, मोती चौक अशा चौकोनातील पाच गल्ल्यांमध्ये सुमारे तीनशे ते चारशे दुकाने आहेत. केवळ मोबाइल मार्केटमध्ये शेकडो दुकाने आहेत.

'इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक आणि मोबाइल यांच्याशी संबंधित कोणतीही वस्तू येथे हमखास मिळते. शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून खरेदीसाठी अनेक नागरिक येथे येतात. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक व्यापारी येथूनच खरेदी करतात. करोनाआधी येथे रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असे. मुंबईत लोहार चाळ परिसराप्रमाणेच आता पुण्यातील हा परिसर 'मोबाइल, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक हब' बनला आहे,' असे पुणे तपकीर गल्ली इलेक्ट्रिकल असोसिएशनचे सचिव हेमंत शहा यांनी सांगितले.

पूर्वी नागरिकांची क्रयशक्ती मर्यादित होती आणि विद्युत उपकरणे स्वस्त नव्हती. त्यामुळे नागरिकांच्या या बाबतीतील गरजाही मर्यादित होत्या. गेल्या दोन दशकांमध्ये नागरिकांची क्रयशक्ती चांगलीच वाढली. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये घर सजविण्याबाबत जागृती‌ झाली. त्यामुळेही येथील मार्केटला चालना मिळाली. ऑनलाइन खरेदीचा मार्ग असतानाही या गल्ल्यांमधून फेरफटका मारून वस्तू हाताळून ती खरेदी करण्याची मौज काही वेगळीच आहे. ऑनलाइन खरेदीला याची सर नसल्याने स्पर्धेच्या काळातही या पारंपरिक बाजारपेठा अस्तित्व टिकवून आहेत.


मोबाइल, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची बाजारपेठ म्हणून तपकीर गल्ली आणि आजूबाजूच्या परिसराची ओळख आहे. येथील घाऊक आणि किरकोळ दुकानांच्या माध्यमातून हजारो व्यावसायिक; तसेच कामगार यांचे काम चालते. करोनामुळे व्यावसायिकांचे दीड वर्षांत हजार ते बाराशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

- हेमंत शहा, सचिव, पुणे तपकीर गल्ली इलेक्ट्रिकल असोसिएशन

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज