अ‍ॅपशहर

‘करोना’च्या विषाणूतअद्याप बदल नाहीच

सध्या देशासह जगभर हैराण करणाऱ्या 'करोना' विषाणूला प्रतिबंध करणारी औषधे अद्याप उपलब्ध नाहीत. असे असूनही जगभर लागण झालेले ८५ टक्के रुग्ण बरे होत आहेत. 'करोना' विषाणूमध्ये कोणताही बदल झालेला नाही, याचा अर्थ भविष्यात होणारच नाही असे सांगता येणार नाही. चीनमध्ये तापमान कमी असल्याने विषाणूचा प्रसार झपाट्याने झाला.

Maharashtra Times 15 Mar 2020, 7:12 am
म. टा. प्रतिनिधी, पुणे: सध्या देशासह जगभर हैराण करणाऱ्या 'करोना' विषाणूला प्रतिबंध करणारी औषधे अद्याप उपलब्ध नाहीत. असे असूनही जगभर लागण झालेले ८५ टक्के रुग्ण बरे होत आहेत. 'करोना' विषाणूमध्ये कोणताही बदल झालेला नाही, याचा अर्थ भविष्यात होणारच नाही असे सांगता येणार नाही. चीनमध्ये तापमान कमी असल्याने विषाणूचा प्रसार झपाट्याने झाला. मात्र, पुण्यात तापमान जास्त असल्याने प्रसार होण्याची शक्यता कमी आहे, असे स्पष्टीकरण राज्याचे माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी दिले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ‘करोना’च्या विषाणूतअद्याप बदल नाहीच


राज्य सरकारने स्वाइन फ्ल्यू नियंत्रित करण्यासाठी पूर्वीच साथरोग नियंत्रण समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष डॉ. साळुंखे आहेत. त्याच समितीवर आता 'करोना' विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी पावले उचलण्याचे तसेच धोरण निश्चित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या समितीची आरोग्य विभागात बैठक झाली. त्या वेळी आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील उपस्थित होत्या.

'कोणत्याही विषाणूची जनुकीय रचना सातत्याने बदलते. मात्र, करोना विषाणूमध्ये अद्याप बदल नोंदविला गेलेला नाही. इतर विषाणूंच्या तुलनेत करोना विषाणूचा अभ्यास करण्यास कमी वेळ मिळाला आहे. शिंकल्यानंतर हा विषाणू शरीरातून बाहेर पडतो. त्या वेळी जर तेथील तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअस असेल तर तो जास्त काळ टिकतो. चीनमध्ये तापमान कमी असल्याने या विषाणूचा प्रसार झपाट्याने झाला. मात्र, आपल्याकडे तापमान जास्त असल्याने अधिक प्रसार होण्याची शक्यता कमीच आहे. देशभरातून विषाणूंचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) येत आहे. त्यांचे शास्त्रज्ञ त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत,' याकडे डॉ. साळुंखे यांनी लक्ष वेधले.

करोना विषाणूसंदर्भात कोणती औषधे वापरावीत याबाबत केंद्राकडून कोणत्याही सूचना आल्या नाहीत. तसेच, हा विषाणू किती प्रमाणात वाढेल किंवा कमी होईल याबाबत काहीही सांगता येणार नाही. आरोग्य विभाग तसेच अन्य प्रशासन करोनाचा संसर्ग रोखण्यास सज्ज आहे. नागरिकांनीही खबरदारी घेणे आवश्यक आहे. योग्य काळजी घेतल्यास हा आजार नियंत्रण ठेवणे शक्य आहे.

- डॉ. सुभाष साळुंखे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज