म. टा. प्रतिनिधी, पुणे
पती-पत्नीचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार कॅम्प परिसरात समोर आला. या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ३६ वर्षीय महिलेने तक्रार दिली. त्यानुसार सर्फराज इक्बाल पटेल (रा. कॅम्प) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तक्रारदार व त्यांच्या पतीचे खासगी फोटो मिळविले. ते फोटो एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केले. तक्रारदार यांनी त्यांच्या पतीसोबत फारकत घ्यावी म्हणून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. तसेच, त्यासाठी आरोपीने त्यांच्यावर दबाव आणून धमकी दिल्याची तक्रार महिलेने दिली आहे. या प्रकरणी लष्कर पोलिस अधिक तपास करत आहेत.