म. टा. वृत्तसेवा, भोर
तालुक्यातील जोगवडी येथे कौटुंबिक वादातून चुलत भावाच्या डोक्यात कोयत्याचे घाव घालून व दांडक्याने मारहाण करून खून केल्याची घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली. सुनील किसन आलगुडे (वय ३५)असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी मृत सुनील यांचे भाऊ अनिल यांनी राजगड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार संजय हैबती आलगुडे (वय ४२) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सुनील व हैबती चुलत भाऊ असून, ते एकमेकांशेजारी राहतात. हैबतीला दारूचे व्यसन असल्यामुळे त्याची पत्नी पाच-सहा वर्षांपासून माहेरी राहते. सुनील यांच्या सांगण्यामुळे आपली पत्नी माहेरी गेली, असा संशय हैबतीच्या मनात होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद व्हायचे. सकाळी गावातील पोलिस पाटलाच्या घराजवळ मशिन चौकात सुनील थांबले होते. त्या वेळी हैबतीने त्यांच्या डोक्यात कोयत्याचा जोरदार घाव घातला. त्यामुळे सुनील खाली पडले. त्यानंतर लाकडी दांडक्याने अनिलने त्यांना पुन्हा मारहाण केली. त्यानंतर तो पळून गेला. सुनील यांना गावातील लोकांनी भोरच्या उप जिल्हा रुग्णालयात औषधोपचारांसाठी आणले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे आरोपींचा शोध घेत आहेत.