म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्या विरोधात बंडखोरी करणारे भाजपचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याची माहिती भाजपच्या प्रदेश कार्यालयातून देण्यात आली.
महायुतीच्या जागा वाटपामध्ये पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला आहे. शिवसेनेने विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना येथून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी बंडखोरी केली असून ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे भाजपने गुरुवारी ओव्हाळ यांची पक्षातून हकालपट्टी केली. पिंपरी-चिंचवड पालिकेच्या निवडणुकीत रावेत -किवळे या प्रभागातून ओव्हाळ भाजपच्या चिन्हावर नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. काही दिवसांपूर्वी गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी यांचा कार्यक्रमदेखील त्यांनी घेतला होता. त्या कार्यक्रमात मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. त्यामुळे पक्षात ओव्हाळ यांच्याबद्दल नाराजी होती. त्यातच त्यांनी बंडखोरी करून विधानसभेच्या निवडणुकीत अर्ज दाखल केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.