अ‍ॅपशहर

महिला अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढले

जिद्द आणि मोठी स्वप्ने तुमच्याकडे असतील, तर तुम्ही ती नक्कीच पूर्ण करू शकता. पोलिस दलात शिपाई म्हणून भरती झालेल्या महिला कर्मचारी खात्याअंतर्गत परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करत आहेत.

Shrikrishna kolhe | Maharashtra Times 9 Mar 2018, 7:51 am
पुणे : जिद्द आणि मोठी स्वप्ने तुमच्याकडे असतील, तर तुम्ही ती नक्कीच पूर्ण करू शकता. पोलिस दलात शिपाई म्हणून भरती झालेल्या महिला कर्मचारी खात्याअंतर्गत परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करत आहेत. गेल्या काही वर्षात महिला कर्मचाऱ्यांमधून अधिकारी होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिस अधिकाऱ्यांना कायदा सुरक्षा राखण्यासाठी दिवसातील १२ तासांहून अधिक काम करावे लागते. अनेकदा त्यांच्या कामाचे तास आणि ताण वाढतात. पण, अशा परिस्थितीमध्येही या महिला अधिकारी त्यांचे आव्हान सक्षमपणे पेलताना दिसत आहेत. खात्यात नव्याने दाखल झालेल्या अनेक तरुणी केवळ पोलिस कर्मचारी न राहता अधिकारी होण्याचा जिद्दीने पाठपुरावा करत आहेत. कर्मचाऱ्यांपासून अधिकारी झालेल्या दहा ते पंधरा महिला अधिकारी पुण्यात काम करत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the ratio of women officers increased
महिला अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढले


राज्यात पोलिस दलात महिलांचे प्रमाण फक्त १४ टक्के असून एकूण पोलिस मनुष्यबळाच्या तुलनेत ते खूपच कमी आहे. महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. या गुन्ह्यांचा तपास फक्त महिला अधिकाऱ्यांनीच करावा, असे निर्देश आहेत. मात्र, अनेक पोलिस ठाण्यात तपास करण्यासाठी बाहेरील पोलिस ठाण्यातून महिला अधिकारी बोलविण्याची वेळ येते. राज्यात सध्या एक लाख ७८ हजार ४१९ पुरुष पोलिस आहेत. तर महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संख्याबळ २६ हजार २३६ आहे. यामध्ये १ हजार ७४३ अधिकारी तर, २४ हजार २०४ कर्मचारी आहेत. एका महिला अधिकाऱ्यामागे १४ महिला पोलिस कर्मचारी असे प्रमाण आहे. अलिकडे पोलिस भरतीमध्ये तरुणी सहभागी होण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच, अनेक उच्च शिक्षित तरुणी पोलिस शिपाई म्हणून भरती होत आहेत. पण, पोलिस शिपाई म्हणून काम करताना मिळणारा मान, कामाच्या वेळा, सन्मान या गोष्टी पाहिल्यानंतर अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगत आहेत. ते पूर्ण करण्यासाठी नोकरी करून अभ्यास करत त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहेत. पोलिसाची नोकरी करताना त्यांच्या ड्युटीच्या वेळा, बंदोबस्त ही सगळी कामे करून जिद्दीने अभ्यास करत अनेक महिला अधिकारी झाल्या आहेत.

पोलिस दलात पोलिस कर्मचारी म्हणून भरती झाल्यानंतर अधिकारी होण्यासाठी पुरुषांकडून मोठ्या प्रमाणत प्रयत्न केले जात होते. अनेक पुरुष कर्मचारी म्हणून दाखल झाल्यानंतर अधिकारी होऊन निवृत्त देखील झाले आहेत.

पूर्वी भरती झालेल्या तरुणींचे अधिकारी होण्याचे प्रमाण कमी होते. पोलिस दलात एकदा भरती झाले की लग्न, संसार आणि नोकरी करण्यावर अनेक तरुणींचा भर होता. अलिकडे पोलिस शिपाई झालेल्या अनेक तरुणी उच्च शिक्षित आहेत. त्या नोकरी करतानाच राज्य सेवा आयोगाबरोबरच, केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा देत आहेत. उपनिरीक्षकांबरोबर इतर सरकारी विभागांच्या परीक्षा देण्यावरसुद्धा तरुणींचा भर आहे. ड्युटीमुळे अभ्यासाला वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेक तरुणी अभ्यास करायला वेळ मिळावा म्हणून कार्यालयीन काम असलेल्या ठिकाणी नेमणूक व्हावी म्हणून प्रयत्न करतात. काम करत असताना वेळ मिळाला, तर त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. त्यामुळेच पोलिस शिपाई म्हणून दाखल झालेल्या अनेक मुली आता अधिकारी होऊ लागल्या आहेत. पुण्यात सध्या पोलिस कर्मचाऱ्यापासून उपनिरीक्षक ते सहायक निरीक्षक झालेल्या दहा ते बारा महिला अधिकारी काम करत आहेत.

रात्री उशिरापर्यंत अभ्यास

पोलिस दलात शिपाई म्हणून भरती झाले. पण, खात्यात दाखल झाल्यानंतर मला अधिकारी व्हायचे होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. माझ्या प्रमाणेच खात्यात नवीन दाखल झालेल्या अनेक मुली अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून आहेत. दिवसभर ड्युटी असते, मध्येच बंदोबस्त असतो, त्यामुळे दिवसभर ड्युटी करून आल्यानंतर रात्री किंवा पहाटे चार तास अभ्यास करत आहेत. तसेच, खात्यात अनेक मुली बंदोबस्तावर देखील स्पर्धा परीक्षेची पुस्तके घेऊन वेगळ मिळाल्यास अभ्यास करतात. कुटुंबीयांकडून देखील या गोष्टीसाठी प्रोत्साहन दिले जाते.

- महिला पोलिस कर्मचारी

पुणे ग्रामीणमध्ये २००६मध्ये पोलिस म्हणून भरती झाले. त्यानंतर परमेश्वर नलावडे यांच्याशी विवाह झाला. आम्हाला एक मुलगी आहे. मी अधिकारी व्हावे म्हणून माझ्या पतींनी खूप प्रोत्साहन दिले. दिवसभर काम केल्यानंतर रात्री ते स्वतः माझ्याकडून अभ्यास करून घेत होते. २०१२मध्ये पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण झाले. सध्या खडक पोलिस ठाण्यात नेमणुकीला आहे. पोलिस दलामध्ये महिलांचे प्रमाण खूप कमी आहे. अलिकडे पोलिस दलात भरती होण्याचे तरुणींचे प्रमाण वाढत आहे. मात्र, खात्यात आल्यानंतर कर्मचाऱ्याला मान मिळत नाही. अधिकाऱ्याचे जीवन पाहिल्यानंतर कर्मचारी तरुणी अभ्यास करून अधिकारी होण्याचा प्रयत्न करत आहेत. महिलांच्या समस्या महिला अधिकाऱ्यांनाच सांगू शकतात. तसेच, एखादी गोष्ट सांगायची असेल, तर कर्मचाऱ्यांच्या सांगण्याचा प्रभाव पडत नाही. तीच गोष्ट अधिकाऱ्याने सांगितली, तर त्याचा प्रभाव पडतो. त्यामुले महिला अधिकारी होण्यासाठी तरुणींकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत.

- सीमा चौधरी, पोलिस उपनिरीक्षक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज