अ‍ॅपशहर

कॉलेजच्या चुकीमुळे विद्यार्थी नापास

सासवडच्या वाघिरे कॉलेजातील प्रकार; अंतर्गत गुण न पाठवल्याचा परिणामम टा...

Maharashtra Times 28 Jul 2018, 4:00 am

सासवडच्या वाघिरे कॉलेजातील प्रकार; अंतर्गत गुण न पाठवल्याचा परिणाम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सासवडच्या वाघिरे कॉलेजने एमकॉम द्वितीय वर्षाच्या चौथ्या सत्रातील 'इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी' या विषयाच्या अंतर्गत गुणांची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला न पाठविल्याने कॉलेजचे ५८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याच प्रकार समोर आला आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी न्याय मिळण्यासाठी त्यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांना निवेदन दिले आहे. कॉलेज प्रशासनानेही विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

विद्यापीठाच्या एमकॉमच्या द्वितीय वर्षाचा निकाल ९ जुलैला ऑनलाइन जाहीर झाला. त्यात सासवडच्या वाघिरे कॉलेजच्या एमकॉम अभ्यासक्रमाचे ५८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे आढळून आले. 'इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी' या विषयामध्ये अनुत्तीर्ण, असे नमूद करण्यात आल्याने निकालातही अनुत्तीर्ण शेरा होता. विद्यार्थ्यांनी चौकशी केल्यावर या विषयाची श्रेणी गुणपत्रिकेत गृहित न घरल्याने निकाल अनुत्तीर्ण आला असल्याचे सांगण्यात आले. विद्यापीठाला या प्रकाराबाबत माहिती दिली जाईल. छापील गुणपत्रिकेत उत्तीर्ण असल्याचा निकाल येईल, असे कॉलेजकडून सांगण्यात आले. मात्र, छापील गुणपत्रिकेतही अनुत्तीर्ण निकाल आला. त्यानंतर कॉलेज प्रशासनाने इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी विषयाचे अंतर्गत गुण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला न पाठविल्याने विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणात विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या निकालामुळे पुढच्या शैक्षणिक प्रवेशाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान, कॉलेजकडून संबंधित विषयाची गुणांची श्रेणी विद्यापीठाकडे पाठवण्यात आलेली होती. पुढे काय झाले, याची कल्पना नाही. मात्र, कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांना प्रकरणाची कल्पना देण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थी उत्तीर्ण होण्याबाबत कॉलेजचा पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांना योग्य तो निकाल मिळेल, असे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सांगितले.

...........

कारवाईचे आश्वासन

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि ते नियमानुसार उत्तीर्ण व्हावे, यासाठी नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाच्या (एनएसयुआय) शिष्टमंडळाने डॉ. चव्हाण यांना निवेदन दिले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, याची विद्यापीठ प्रशासन पूर्ण काळजी घेईल. त्याचप्रमाणे या प्रकरणात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. चव्हाण यांनी दिल्याचे 'एनएसयूआय'चे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख यांनी सांगितले. शिष्टमंडळात भूषण रानभरे, उमेश पवार, अजित किर्दक, अभिजित पाटील यांचा समावेश होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज