म. टा. प्रतिनिधी, पुणे
कोथरूड येथे बुधवारी वाहनांच्या तोडफोडीची घटना ताजी असताना पर्वती दर्शन भागात राहणाऱ्या गुन्हे शाखेतील एका पोलिस कर्मचाऱ्याचीच दुचाकी जाळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.
या प्रकरणी एका महिलेने (रा. पर्वती दर्शन) दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांचे पती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेत नेमणुकीस आहेत. या प्रकरणी तुषार प्रकाश पुरोहित, आदित्य अरुण जाधव, मयूर चंद्रकांत शहा (तिघेही रा. पर्वती दर्शन) यांना अटक केल्यानंतर जामिनावर सोडण्यात आले आहे. दहा दिवसांपूर्वी फिर्यादीच्या घराबाहेर लावलेली दुचाकी पुरोहित, जाधव, शहा यांनी रात्री पेटवून दिली. दुचाकी पेटल्यामुळे निर्माण झालेला धूर फिर्यादीच्या खिडकीजवळ झोपलेल्या त्यांच्या वयोवृद्ध सासऱ्याच्या नाकातोंडात गेला. त्यामुळे ते झोपेतून जागे झाले आणि दुचाकी पेटविल्याचे दिसून आले.
त्या वेळी फिर्यादीचे पती रात्रपाळीला कामाला गेले होते. त्यांनी पतीला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर जवळच्या पोलिस चौकीत जाऊन त्यांनी फिर्याद दिली. त्यांचे पती दुसऱ्या दिवशी घरी परतल्यानंतर त्यांच्या घराच्या परिसरातील 'सीसीटीव्ही' कॅमेऱ्यांचे चित्रीकरण मिळवून दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी जाळपोळ करणाऱ्या तिघांना अटक केली.
\Bअटक आणि सुटका...
\Bशहरातील विविध भागांमध्ये दुचाकींची तोडफोड करून जाळपोळ करण्याच्या घटनांना चाप लावण्यात पोलिसांना अपयश आल्याचे दिसून येते. तसेच, हा गुन्हा जामीनपात्र असल्याने दुचाकीची तोडफोड करून जाळपोळ केल्याप्रकरणी अटक केलेल्यांना त्वरित जामिन मिळतो. या घटनांमुळे सामान्यांचे आर्थिक नुकसान होत असून, त्यांच्या मनात भीतीदेखील बसत आहे. पर्वती दर्शन भागातील गुंडगिरीमुळे सामान्य नागरिक दहशतीखाली असल्याचे फिर्यादी यांनी सांगितले.