अ‍ॅपशहर

तीनशे खांब अन् ३० टक्के काम

गेल्या महिन्याभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीचे जाहीर कौतुक केले असले, तरी त्यामुळे येत्या वर्षभरात शहरातील मेट्रो कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आव्हान महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनसमोर (महामेट्रो) उभे राहिले आहे.

सुनीत भावे | 30 24 Dec 2018, 11:04 am
पुणे : गेल्या महिन्याभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीचे जाहीर कौतुक केले असले, तरी त्यामुळे येत्या वर्षभरात शहरातील मेट्रो कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आव्हान महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनसमोर (महामेट्रो) उभे राहिले आहे. मेट्रोच्या पिंपरी ते रेंजहिल्स (रिच-१) आणि वनाझ ते शिवाजीनगर धान्य गोदाम (रिच-२) या दोन टप्प्यांवर आतापर्यंत तीनशे खांब (पिलर) उभे राहिले असून, दोन खांबांना जोडणारे ७५ स्पॅनही पूर्ण झाले आहेत. दोन्ही मार्गांचे सरासरी ३० टक्के काम पूर्ण झाले असले, तरी आता बांधकामासोबत (सिव्हिल वर्क) नव्या वर्षात मेट्रो धावण्यासाठी इतर पूरक कामांना महामेट्रोला गती द्यावी लागणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम metro-piller


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६मध्ये पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन केले. पिंपरी ते रेंजहिल्सदरम्यानचे काम जून २०१७पासून, तर वनाझ ते धान्य गोदाम मार्गाचे काम ऑक्टोबर २०१७पासून सुरू झाले. केंद्र-राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या निधीतून १८ किमीच्या मार्गाला गती दिली गेली. गेल्या वर्षभरात या दोन्ही मार्गांवरील कामाची प्रगती झपाट्याने झाली आहे. पिंपरी मार्गावर एकूण साडेचारशे खांबांची उभारणी केली जाणार असून, त्यापैकी १९१ खांब पूर्ण झाले आहेत. तर, वनाझ मार्गावर सव्वातीनशे खांबांची निर्मिती केली जाणार आहे. त्यापैकी, १२० खांब महामेट्रोने पूर्ण केले आहेत.

मेट्रोच्या दोन खांबांमध्ये सरासरी २८ मीटरचे अंत असते. हे खांब जोडण्यासाठी सेगमेंट निर्मितीची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात आहे. हे सेगमेंट एकमेकांना जोडून दोन खांबांमध्ये स्पॅनची निर्मिती केली जाते. त्यावर, मेट्रोसाठी रूळ (ट्रॅक) टाकले जातात. तसेच, मेट्रो धावण्यासाठी दोन्ही बाजूला विजेचे खांब उभारून ओव्हरहेड वायर टाकली जाते. येत्या वर्षभरात पिंपरी ते फुगेवाडी दरम्यानच्या प्राधान्य मार्गावर ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने निश्चित केले आहे. पंतप्रधान मोदी यांनीच पुण्यातील १२ किमी मार्गावर पुढील वर्षी मेट्रो धावेल, असे जाहीर केल्याने आता महामेट्रोने कंत्राटदारांना कामे पूर्ण करण्याची मुदत घालून दिली आहे. ही कामे वेळेत पूर्ण करून घेण्याकडे आता महामेट्रोला सर्वाधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

(क्रमश:)

...

३५%

पिंपरी ते रेंजहिल्स कामाची प्रगती

...

३०%

वनाझ ते धान्य गोदाम मार्गाची प्रगती

...

~ ६५० कोटी

मेट्रोच्या विविध कामांसाठी आजवर झालेला खर्च

...

मेट्रोचे आतापर्यंतचे काम

- पिंपरी ते दापोडी मार्गावर लाँचिंग गर्डरद्वारे स्पॅनची जोडणी

- वल्लभनगर, फुगेवाडी स्टेशनसाठी पिअर आर्मचे काम सुरू

- वनाझ ते धान्य गोदाम मार्गावर खांब उभारणी वेगात

- आयडियल कॉलनी स्टेशनसाठी पिअर आर्मच्या कामाला गती

..

पुणे मेट्रोच्या जलदगतीने केल्या जाणाऱ्या कामाची दखल पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून घेतली आहे. त्यांनी दिलेल्या प्रशस्तीपत्रामुळे हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आणखी हुरूप आला आहे. पंतप्रधानांच्या अपेक्षेनुसार पहिल्या टप्प्यातील मेट्रो पुढील वर्षअखेर निश्चित कार्यान्वित करू.

- ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज