पिंपरी : फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या सोलापूरच्या उपमहापौर राजेश काळे यांना सर्दी-ताप आल्याने सोडून दिल्याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांची तडकाफडकी बदली, तर फौजदार रवींद्र पन्हाळे यांना निलंबित करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी मंगळवारी (३ जून) हे आदेश दिले आहेत.
सांगवी परिसरातील फ्लॅट विक्री घोटाळाप्रकरणी भाजप नगरसेवक आणि सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी पोलिसांनी ताब्यात घेऊन करोनाच्या भीतीपोटी सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (३० मे) घडला होता. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवल्याची चर्चा पोलिस दलात सुरू झाली होती.
मोठा गाजावाजा करून काळे यांना सोलापूर येथील विजापूर पोलिस ठाण्याच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने शुक्रवारी रात्री ताब्यात घेण्यात आले होते. काळे यांच्या अटकेची तयारी सुरू असता त्यांना ताप आणि शिंका सुरू झाल्याने करोनाच्या भीतीमुळे सांगवी पोलिस ठाण्यातील कनिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना न कळविता परस्पर काळे यांना नोटीस बजावून सोडून दिले होते. यानंतर पोलिस आयुक्त बिष्णोई यांच्या सांगण्यावरून पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.