अ‍ॅपशहर

झाडांच्या जागी वाहनतळ?

गेल्या वर्षी एक जुलैला पार पडलेल्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत खेड तालुका प्रांत कार्यालयाच्या आवारात पाठीमागच्या बाजूला लागवड केलेली झाडे जेसीबी मशिनने तोडून ती जागा साफ करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Maharashtra Times 16 Jan 2017, 3:40 am
म. टा. प्रतिनिधी, राजगुरूनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tree cuts in rajgurunagar
झाडांच्या जागी वाहनतळ?


गेल्या वर्षी एक जुलैला पार पडलेल्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत खेड तालुका प्रांत कार्यालयाच्या आवारात पाठीमागच्या बाजूला लागवड केलेली झाडे जेसीबी मशिनने तोडून ती जागा साफ करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. झाडे तोडल्यानंतर ती जाळून टाकण्यात आली. झाडे तोडून साफ केलेल्या जागेत चारचाकी गाड्यांसाठी वाहनतळ म्हणून वापर करण्याचा घाट घातला जाणार असल्याचे समजते.

दरम्यान, प्रांताधिकाऱ्यांनी ही वृक्षतोड व जागा साफ करण्याशी आमच्या कार्यालयाचा काहीही संबंध नसल्याचे सांगून हात झटकले आहेत. संबंधित अधिकारी जबाबदारी झटकत असले, तरी या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच झाडे तोडून जागा जेसीबीने साफ करण्यात आलेली आहेत. गेल्या वर्षी एक जुलैला खेड तालुक्यात मोठ्या उत्साहात सुमारे तीन लाख रोपांची लागवड करण्यात आली होती. या वृक्षलागवड कार्यक्रमात विशेषत: चाकण व राजगुरूनगर वनविभाग, इतर सर्व शासकीय यंत्रणा, पंचायत समिती, सर्व ग्रामपंचायती, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, तालुक्यातील शाळा-कॉलेज, खासगी संस्था, चाकण एमआयडीसीतील विविध कंपन्या; तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. दरम्यान, खेडचे तत्कालीन प्रांताधिकारी हिम्मतराव खराडे, तहसीलदार सुनील जोशी, नायब तहसीलदार लतादेवी वाजे, नायब तहसीलदार राजेंद्र जाधव व महसूल कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रांत कार्यालयाच्या आवारात मागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत वीसपेक्षा अधिक विविध जातींच्या दीड वर्ष वयाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. ही सर्व रोपे महिंद्रा फायनान्स या कंपनीने पुरविली होती. मुळातच या कार्यालयाच्या आवारात पूर्वीच एक छोटी बाग विकसित करण्यात आलेली आहे; तसेच कार्यालयाच्या पाठीमागे अनेक झाडे आहेत. या ठिकाणी पाण्याची उपलब्धतादेखील चांगली असल्यामुळे पाण्याचा तुटवडा कधी जाणवत नाही.

गेल्या वर्षी केलेल्या वृक्षारोपणामुळे कार्यालयाच्या आवाराला आणखी सौंदर्य लाभले होते; परंतु दोन दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास जेसीबी मशिन आणून कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली झाडे तोडून जागा सपाट करण्यात आली. एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर या ठिकाणी चारचाकी गाड्यांसाठी वाहनतळ तयार केला जाणार असल्याचे सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज