अ‍ॅपशहर

ठप्प कामकाजामुळे वाहतूकदार हैराण

स्टेट बँकेच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) ४१ ऑनलाइन सेवांचे आर्थिक व्यवहार सलग चौथ्या दिवशीही ठप्प झाले. त्यामुळे आरटीओशी संबंधित कामांची प्रक्रिया रखडल्याने हैराण झालेल्या वाहतूकदारांनी मंगळवारी आरटीओच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.

Maharashtra Times 20 Dec 2017, 4:58 am
आरटीओच्या प्रवेशद्वारावर केले आंदोलन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम truck drivers did agitations against rto
ठप्प कामकाजामुळे वाहतूकदार हैराण


म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्टेट बँकेच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) ४१ ऑनलाइन सेवांचे आर्थिक व्यवहार सलग चौथ्या दिवशीही ठप्प झाले. त्यामुळे आरटीओशी संबंधित कामांची प्रक्रिया रखडल्याने हैराण झालेल्या वाहतूकदारांनी मंगळवारी आरटीओच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.
राज्यातील बहुतांश परिवहन कार्यालयांमध्ये ‘वाहन ४.०’ आणि ‘सारथी ४.०’ ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याद्वारे स्टेट बँकेच्या माध्यमातून आरटीओतील ४१ प्रकारच्या कामांसाठी ऑनलाइन पद्धतीने शुल्क आकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, त्यामधील त्रुटींमुळे वाहतूकदार आणि नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच स्टेट बँकेच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने शुक्रवारपासून आरटीओचे कामकाज ठप्प झाले आहे. परिणामी ई-पेमेंट होत नसल्याने शेकडो वाहनचालकांना परवान्यासाठी देण्यात आलेली वेळ वाया गेली आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहतूकदारांना प्रचंड मनःस्ताप भोगावा लागत आहे.
त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आरटीओ प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य चालक-मालक संघटनेचे शहराध्यक्ष प्रकाश जगताप, विक्रांत विगरूळकर, नीलेश ढवळे, प्रकाश मोकाशी यांच्यासह शेकडो आरटीओ प्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले होते. ऑनलाइन पेमेंटसाठी पर्यायी बँकेची व्यवस्था असावी, गरजेच्या वेळी ऑफलाइन पेमेंट स्वीकारावे, वाहनांच्या चाचणीसाठी बेड रोल टेस्टिंग यंत्रणा घ्यावी, आळंदी रस्त्यावरील टेस्ट ट्रॅकवर रिक्षांचे पासिंग करावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांना दिले.

कोट
ऑनलाइन प्रणाली ठप्प झाल्याने रोख स्वरुपात पैसे स्वीकारण्यास अथवा पर्यायी बँकेची लिंक उपलब्ध करून देण्याची परवानगी मागितली आहे. आळंदी रस्त्यावरील शंभर मीटरच्या टेस्ट ट्रॅकवर रिक्षांचे पासिंग करता येऊ शकते. येत्या काही दिवसांत आणखी दोन टेस्ट ट्रॅक उपलब्ध होण्याची शक्यता असून ऑनलाइन यंत्रणेतील त्रुटी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी

प्रायोगिक तत्त्वावर लहान आरटीओ कार्यालयात ऑनलाइन यंत्रणा राबविण्याच्या आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत संपूर्ण राज्यभरात ऑनलाइन सुविधा सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीतील त्रुटींमुळे वाहतूकदारांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शुक्रवारी राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
बाबा शिंदे, महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज