अ‍ॅपशहर

कारागृहात व्हिडिओ कॉलिंग

येरवडा कारागृह प्रशासनाने नुकतेच शिक्षा भोगणाऱ्या महिला कैद्यांशी नातेवाइकांना बोलण्यासाठी ‘व्हिडिओ कॉलिंग’ची सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे.

Maharashtra Times 22 Nov 2017, 3:00 am
येरवडा महिला बंदिस्त कारागृहात प्रशासनाचा उपक्रम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम video calling facility for women inmates in yerwada jail
कारागृहात व्हिडिओ कॉलिंग


संदीप भातकर, येरवडा
राज्यातील आणि परराज्यातील विविध जिल्ह्यांतून वेगवेगळ्या गुन्ह्यांत येरवडा महिला बंदिस्त कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या महिला कैद्यांशी बोलण्यासाठी नातेवाइकांना आता प्रत्यक्षात कारागृहात येण्याची गरज भासणार नाही. कारण येरवडा कारागृह प्रशासनाने नुकतेच शिक्षा भोगणाऱ्या महिला कैद्यांशी नातेवाइकांना बोलण्यासाठी ‘व्हिडिओ कॉलिंग’ची सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आगामी काळात राज्यातील सर्व महिला आणि पुरुषांच्या खुल्या कारागृहात त्याची अंमलबजावणी केली जाईल.

राज्यातील विविध मध्यवर्ती आणि महिलांच्या कारागृहात वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांत शिक्षा हजारो कैदी शिक्षा भोगत आहे. मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना आपल्या कुटुंबातील नातेवाइकांशी बोलण्यासाठी इंटरकॉम फोन सुविधा उपलब्ध आहे. नातेवाइकांना आठवड्यातून एकदा कारागृहातील कैद्याला भेटण्याची (फोनवर बोलण्याची) मुभा असते. मात्र, लांब अंतरावर राहणाऱ्या नातेवाइकाला सकाळी कैद्याची भेट घेण्यासाठी आदल्या रात्री गावातून कारागृहकडे निघावे लागते. त्यामुळे नातेवाइकांचा वेळ आणि पैसा वाया जातो. कारागृहात मुलाखतीला आल्यावर नातेवाइकांना कैद्यांशी काचेच्या आड इंटरकॉमच्या माध्यमातून बोलावे लागते.

गेल्या काही महिन्यांपासून कारागृहात कच्च्या कैद्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे दैनंदिन मुलाखतीसाठी येणाऱ्या नातेवाइकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्याचा प्रशासनावर ताण वाढत आहे. नातेवाईकांची होणारी धावपळ आणि प्रशासनावरचा ताण कमी करण्यासाठी महिला कैद्यांसाठी प्रथमच ‘व्हिडिओ कॉलिंग’ची सुविधा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या पुढाकाराने राज्यात अमरावतीपाठोपाठ येरवडा महिला कारागृहात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार यासंदर्भात म्हणाले, ‘येरवडा महिला कारागृहात शनिवारपासून (१८ नोव्हेंबर) व्हिडिओ कॉलिंग सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. कारागृहात प्रथमच स्मार्ट फोनच्या मदतीने महिला कैद्यांना नातेवाइकांशी संवाद साधता आला. व्हिडिओ कॉलिंगमुळे एकमेकांना चेहऱ्यावरचे हावभाव दिसत असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. शिक्षा भोगणाऱ्या प्रत्येक महिलेला महिन्यातून दोन वेळा व्हिडिओ कॉलिंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी महिला कैद्यांच्या नातेवाइकांकडे स्मार्ट फोन असणे आवश्यक आहे.

सर्व कारागृहात मिळणार सुविधा
व्हिडिओ कॉलिंगचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील सर्व महिला कारागृह आणि पुरुषांच्या खुल्या कारागृहात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. कैद्यांच्या नातेवाइकांचे पोलिस व्हेरिफिकेशन झालेले मोबाइल नंबरच प्रशासनाकडे संपर्कासाठी दिले आहेत. अशा मोबाइल नंबरवर व्हिडिओ कॉलिंग केले जाईल. मात्र, त्यासाठी नातेवाइकाकडे स्मार्टफोन असला पाहिजे. त्यामुळे मुलाखतीसाठी कारागृहात येणाऱ्या नातेवाइकांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज