अ‍ॅपशहर

सर्वसमावेशकतेला तडा

लोकशाहीमुळेच मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जीवावर आपण बरळत सुटलो आहोत आणि देशातील अनेक घटकांचे माणूसपणच हिरावून घेत आहोत, याचेही साधे भान काहींना राहिलेले नाही.

Maharashtra Times 18 Jun 2017, 1:22 pm
आपल्या देशावर प्रत्येकाचेच प्रेम असते. तो काही स्पर्धेचा किंवा दाखविण्याचा मुद्दा होऊ शकत नाही; पण हल्ली तो मुद्दा झाला आहे. म्हणजे देशातील सर्व महत्त्वाचे प्रश्न संपले आहेत आणि आता प्रत्येकानेच देशावर किती प्रेम आहे, ते सिद्ध करण्यासाठी परीक्षा द्यायची आहे. ज्या व्यक्ती आपल्याला आदर्श वाटतात किंवा आपण ज्यांचा आदर करतो अशा व्यक्तीही या परीक्षा घेत आहेत. काही कलाकार मंडळींचे अलीकडील वागणे पाहिले तर मोठ्या पडद्यावरील व्यक्ती छोट्या होताना दिसत आहेत. हे असे होणे भारतीय चित्रपट क्षेत्राच्या आणि समाजाच्या सर्वसमावेशकतेलाच तडा जाण्यासारखे आहे. ताजा संदर्भ आहे तो, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या वक्तव्याचा. ‘सैनिकांना आम्ही सांगितले होते का सीमेवर जीव द्यायला, असे वक्तव्य करणाऱ्यांना जोड्याने मारले पाहिजे. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांवर टीका करणारे अनेक कन्हैया देशात निर्माण होत असून या सर्वांना फाशी दिली पाहिजे. जात-धर्म हे घाणेरडे विचार विसरून सैनिक देशाचे रक्षण करतात. टीका करणाऱ्यांनी सैनिकांबरोबर एक तास राहून दाखवावे आणि नंतर गाढवासारखे बोलावे,’ गोखले असे बरेच काही बोलून गेले. यामध्ये सैनिकांबद्दल जी भावना आहे, ती खरीच आहे. सैनिकांच्या बलिदानामुळेच तर आपण मध्यभागातील लोक सुखात आहोत. गोखले निःसंशय अभिजात अभिनेते आहेत. त्यांचा अभिनय, संवाद, भाषेवरील प्रभुत्व हे सर्व अभिजात कलेमध्ये मोडते. त्यामुळे त्यांच्याप्रती अनेकांना आदर आहेच. मात्र, इतरांच्या देशभक्तीबद्दल आपली फूटपट्टी वापरण्याचा अधिकार त्यांना आहे काय?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vikram gokhale
सर्वसमावेशकतेला तडा

गोखले जे बोलले ते त्यांच्या विचारसरणीला अनुसरूनच होते; पण ते इतके टोकाला जातील, असे वाटले नव्हते. परेश रावल, वीरेंद्र सेहवाग, अक्षय कुमार, गायक अभिजित, अनुपम खेर, शरद पोंक्षे ही मंडळी सतत एकाच पठडीत बोलत राहतात. मुळात ही सर्व मंडळी प्रसिद्ध आहेत. रसिकांचे त्यांच्यावर प्रेम आहे. प्रसिद्धीसाठी राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रविरोधी अशा विभागणीच्या कामात पडण्याचे यांना काय कारण? पूर्वी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना असला की त्याला राष्ट्रप्रेमाचे स्वरूप यायचे; पण तेवढ्यापुरतेच असायचे. आजकाल प्रत्येक दिवस अग्निपरीक्षेचा झाला आहे. गंमत म्हणजे अनेकांना सोयीने राष्ट्रविरोधी ठरविण्याचा पर्याय या परीक्षेत असतो. जरा कुठे वेगळा विचार मांडला की देशद्रोही ठरविण्याची शक्यता निर्माण होते. अशाने दुसरी बाजू समोर आणायचीच नाही, किंवा चुकीचे काही असेल तर त्यावर बोलायचेच नाही. सर्वांनी एका सुरात गायल्यासारखे एकसारखे बोलत राहायचे, हे ‘ट्रोलिंग’ भयंकर आहे.
सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत हे सत्य गेल्या ७० वर्षांतही सत्य होतेच ना? करकरे, कामठे, साळसकर, ओंबाळे हे पोलिस हुतात्मा झाले तेव्हा त्यांच्या अभूतपूर्व धाडसाचे कौतुक देशवासीयांना नव्हते का? या सर्वांबद्दल नागरिकांना आदर आहेच; पण सैनिकांकडून काही चूक होत असेल तर ती चूक मानायची नाहीच का? ही अंधभक्ती कशासाठी? परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी लष्करप्रमुख म्हणून अधिक काळ मिळावा यासाठी जन्मतारखेचा घोळ घातला होता. हा घोळ मानायचा की नाही? देशाच्या सीमाभागातील जीवन आणि आपल्यासारख्या मध्यभागातील लोकांचे जीवन यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. सीमेवर राहणाऱ्या लोकांना दहशतवादी, फुटीरवादी यांच्या अत्याचाराला सतत तोंड द्यावे लागते; तसेच ते काही अपवादात्मक परिस्थितीत गणवेशधारी लोकांच्या अत्याचारालाही तोंड द्यावे लागते. मग ती सीमा पाकिस्तान, बांगलादेश यांची असो की ईशान्य भारताची. येथील प्रत्येक क्षण धुमसणारा असतो. सीमाभागातील लोकांमध्ये सैन्याविषयी अविश्वास निर्माण होताना त्याचा संबंध थेट देशाशी लावणे योग्य होणार नाही. कारण सैन्य सतत आसपास असल्यामुळे रोजच्या जगण्यातील मोकळेपणा संपतो आणि तणावामुळे ही समस्या निर्माण होते. कन्हैयासारख्यांना फासावर लटकवून, अरुंधती रॉय यांना जीपच्या पुढे बांधून हा प्रश्न सुटणारा नाही. देशातील लोकांचे जीवन सुसह्य आणि सीमेवरील लोकांचे तर अधिक सुसह्य करणे हाच त्यावर उपाय आहे.
असा कोणताही सारासार विचार न करता असे वातावरण निर्माण केले जात आहे, की देशात लष्कराबद्दल आदर नाही, आणि तो प्रस्थापित करण्याची जबाबदारी कट्टर राष्ट्रवादी या नात्याने आपल्यावर आली आहे, या थाटात नवराष्ट्रवाद्यांची फौजच्या फौज कामाला लागत आहे.
खरे तर देशातील चित्रपटसृष्टी जात, धर्म व भाषा अशा सर्व बहुअंगाने नटलेली आहे. अशा वातावरणात राहिल्याने व्यक्तीने अधिक उदारमतवादी, माणसाकडे माणूस म्हणून पाहणारे असे विवेकी व्हायला हवे; पण घडतेय ते नेमके उलटे. लोकशाहीमुळेच मिळालेल्या बोलण्याच्या स्वातंत्र्याच्या जीवावर आपण बरळत सुटलो आहोत आणि देशातील अनेक घटकांचे माणूसपणच हिरावून घेत आहोत, याचेही साधे भान काहींना राहिलेले नाही. त्यांची अभिव्यक्ती मान्यच आहे; पण ती हीनतेकडे जाणारी असू नये, इतकेच

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज