अ‍ॅपशहर

कर्जमाफीने आम्ही समाधानी नाहीः पवार

राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केलं आहे. अर्थात, या निर्णयामुळे ते संपूर्ण समाधानी नाहीत, पण सरकारला वेळ देण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.

Maharashtra Times 25 Jun 2017, 5:00 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम we are not completely satisfied with loan waiver decision says sharad pawar
कर्जमाफीने आम्ही समाधानी नाहीः पवार


राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केलं आहे. अर्थात, या निर्णयामुळे ते संपूर्ण समाधानी नाहीत, पण सरकारला वेळ देण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.

'सरकारच्या कर्जमाफीमुळे संपूर्ण समाधान झालेलं नाही. मात्र हे सरकारचे पहिलं पाऊल आहे. काही शेतकरी नेते त्याबाबत आत्ताच नाराजी व्यक्त करू लागलेत. मात्र, हा निर्णय योग्य की अयोग्य याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस इतक्यात बोलणार नाही. त्यासाठी आणखी वेळ द्यावा लागेल आणि सरकारसोबत समन्वयाचीच आमची भूमिका राहील', अशी भूमिका पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. कर्जमाफी हे एक पाऊल झालं, आता आमची मागणी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची आहे, असंही ते म्हणाले.

>> कर्जमाफी ही ३० जून २०१७ पर्यंतच्या थकबाकीदारांना मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सरकारने ३० जून २०१६ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला.

>> ज्यांचं कर्ज दीड लाख रुपयांहून अधिक आहे त्यांना कर्ज फेडण्यासाठी मुदत देण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे केली. राज्य सरकारनी त्याला अनुकूलता दर्शवली. मात्र, दीड लाखाच्या पुढचं कर्ज एकाच वेळी भरण्याची अट घातली. ते शक्य नाही. त्यांना सरकारनी हप्ते बांधून द्यावेत.

>> काही शेतकरी नेते आत्ताच नाराजी व्यक्त करायला लागलेत. मात्र आम्ही सरकारला वेळ देऊ. शेतकरी संपूर्ण समाधानी नाही ही वस्तुस्थिती आहे.

>> राज्यात कांद्याचे दर कोसळलेत. तुरीचे उत्पादन जास्त झाल्याने त्या तुरीचं काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. त्यासाठी सरकारने या दोन पीकांवरची निर्यातबंदी उठवावी.

पूर्णवेळ संरक्षणमंत्री हवा!

काश्मीरमध्ये दररोज देशाचे जवान शहीद होत असताना केंद्र सरकारने ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. पाकिस्तानसोबत युद्ध करा, असं मी म्हणणार नाही. पण कडक कारवाई गरजेचीच आहे. त्यासाठी देशाला पूर्णवेळी संरक्षणमंत्री असणंही आवश्यक आहे, असं मत शरद पवार यांनी मांडलं. कधी-कधी सुरक्षारक्षकांकडून होणारी चौकशी काश्मिरी जनतेसाठी त्रासाची होते आणि मग त्यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया येते. तेही आपलेच नागरिक आहेत, हे ओळखून त्यांना वागणूक मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ही तर त्यांच्या मनातली खदखद!

शिवाजी महाराज हे गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते, असं विधान शरद पवार यांनी अलीकडेच केलं होतं. त्यांच्या या तर्कावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. त्याबाबत विचारलं असता पवार म्हणाले की, शिवरायांनी अफझलखानाला मुस्लिम होता म्हणून नाही तर स्वराज्याचा, रयतेच्या राज्याचा शत्रू होता म्हणून मारलं. छत्रपती शिवरायांनी कधी जात - धर्माचा विचार केला नाही. अफझलखानाला जसा मारला तसा कृष्णाजी कुलकर्ण्यालाही मारला. स्त्रियांबाबत गैरवर्तन करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे हात तोडले. बजाजी निंबाळकर, जावळीचे मोरे अशा कित्येकांवर शस्त्र चालवली. पण माझ्या विधानाचे हवे ते अर्थ घेण्यात आले. माझ्यावर जातीयवादाचा आरोप करणाऱ्यांच्या मनात किती खदखद आहे हे यातून दिसून येतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज