अ‍ॅपशहर

स्वच्छतागृहासाठी महिला पोलिसांची परवड

शहरातील गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यापासून वाहतूक कोंडी सोडविण्यापर्यंतच्या कामांत कायमच हिरीरीने पुढे असणाऱ्या महिला पोलिसांना स्वतंत्र स्वच्छतागृह, चेंजिंग रूम आणि सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल युनिट नसल्याने दररोज कुचंबणा सहन करावी लागत आहे.

रोहित आठवले | Maharashtra Times 14 Feb 2018, 1:53 pm

पिंपरी : शहरातील गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यापासून वाहतूक कोंडी सोडविण्यापर्यंतच्या कामांत कायमच हिरीरीने पुढे असणाऱ्या महिला पोलिसांना स्वतंत्र स्वच्छतागृह, चेंजिंग रूम आणि सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल युनिट नसल्याने दररोज कुचंबणा सहन करावी लागत आहे. पोलिस आयुक्तपदी महिला अधिकारी असतानाही शहरातील आयपीएस अधिकाऱ्यांपासून कॉन्स्टेबल पदापर्यंतच्या अडीच हजार महिला पोलिसांना स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने अनेक आजारांना तोंड द्यायची वेळ आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम women police protection for the sanitary toilets
स्वच्छतागृहासाठी महिला पोलिसांची परवड


शहर पोलिस दलात आजघडीला २२४५ महिला अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये स्वतः पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह, सहायक आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, वैशाली जाधव-माने, जयश्री गायकवाड, उज्ज्वला पिंगळे या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यासह १५५ वरिष्ठ महिला अधिकारी दिवसातील १२ ते १४ तास कर्मचाऱ्यांच्या मदतीने काम करीत आहेत. शहरातील चौका-चौकात थांबून वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिसांना तर स्वच्छतागृहासाठी दररोज कोणत्या ना कोणत्या खासगी स्वच्छतागृहाचा आधार घ्यावा लागतो. शहरातील पोलिसांची जेवढी कार्यालये आहेत, त्यातील निम्म्या ठिकाणीदेखील महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत. जी आहेत, त्यामध्ये एवढी अस्वच्छता असते, की त्यातून अन्य आजारांना आमंत्रण नको म्हणून तेथे जाणेच महिला टाळतात.

गणवेशात असताना ज्या चौकात वाहतूक नियमन करायचे, तेथील एखादे हॉटेल, मॉल किंवा खासगी गृहसंकुलात स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी जाताना मोठी कुचंबणा या महिलांच्या वाट्याला येत आहे. शहरातील काही पोलिस ठाणी तर अशी आहेत, की तेथील स्वच्छतागृहांची किल्ली ही ठाणे अंमलदाराकडून मागून घ्यावी लागते. त्यामुळे बऱ्याच महिला किल्ली मागण्याऐवजी पोलिस ठाण्याबाहेरील स्वच्छतागृहाचा शोध घेतात.

महिला पोलिसांना सॅनिटरी नॅपकिन बदलण्यासाठीही चेंजिंग रूम उपलब्ध नाहीत. त्यामुळे शहर पोलिस दलातील अनेक महिलांना आजारांना तोंड द्यावे लागत आहे. वाहतूक पोलिसांनी तर मिळेल त्या ठिकाणी आपली कार्यालये थाटली आहेत. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर पुरुष कर्मचाऱ्यांनाही स्वच्छतागृहे नाहीत, असे काही महिला पोलिस सांगतात. पुण्यासारख्या स्मार्ट शहरातील पोलिसांना स्वच्छतागृहे नसल्याने होणारी परवड थांबविण्याची मागणी आता महिला पोलिस करू लागल्या आहेत.

महिला लोकप्रतिनिधींकडूनही दुर्लक्ष

पुणे जिल्ह्यात तीन महिला खासदार, चार आमदार, पुण्याच्या महापौर, पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षांसह दोन्ही महापालिकांतील निम्मे सदस्य महिला आहेत; परंतु यातील एकाही महिला लोकप्रतिनिधीने शहर किंवा जिल्हा पोलिसांच्या या प्राथमिक गरजेकडे लक्ष दिलेले नाही. महिला पोलिसांच्या मूलभूत सोयीकडे एक महिला म्हणून या लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

एकंदरीतच तोकड्या आणि अपुऱ्या व्यवस्था आहेत. पुण्यासह राज्यातील कोणत्याच पोलिस विभागात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत का, याचा आढावा आम्ही अद्याप तरी घेतलेला नाही. पोलिस महासंचालक हे राज्य महिला आयोगाचे पदसिद्ध सदस्य असल्याने, त्यांना राज्यातील महिला पोलिसांच्या स्वच्छतागृहांची काय व्यवस्था केली, याची विचारणा आम्ही यापूर्वीच केली होती. महापालिका-जिल्हा परिषदांनी या सोयी उपलब्ध करून द्यायला हव्यात. राज्यातील सर्वच महिला पोलिसांबाबत काय उपाययोजना आहेत, याची चाचपणी केली जाईल.

- डॉ. विजया रहाटकर , अध्यक्ष, राज्य महिला आयोग

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज