अ‍ॅपशहर

राहुल आवारेला पुन्हा संधी

रिओ ऑलिम्पिकला पात्र ठरण्यासाठी प्रतिस्पर्धी मल्लांशी दोन हात करण्याची आणखी एक संधी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेला मिळणार आहे.

Maharashtra Times 19 Apr 2016, 3:00 am
पुणे : रिओ ऑलिम्पिकला पात्र ठरण्यासाठी प्रतिस्पर्धी मल्लांशी दोन हात करण्याची आणखी एक संधी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेला मिळणार आहे. राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत अव्वल स्थानी राहून आणि आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत ब्राँझपदक मिळवूनही पुढील ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतून राहुलला भारतीय कुस्तीगीर संघटनेकडून डावलण्यात आले होते. पण राज्याचे मुख्यमंत्री, खासदार, माजी मंत्री, प्रशिक्षकांनी आवाज उठविल्याने संघटनेने राहुलला मंगोलियातील पात्रता स्पर्धेत पाठविण्याचा निर्णय घेतला. आज, मंगळवारी राहुल मंगोलियाला रवाना होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wrestling rahul aware rio olympic mangolia delhi
राहुल आवारेला पुन्हा संधी


राहुल सध्या ५७ किलो गटात खेळतो. ऑगस्टमध्ये रिओ ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. यासाठी तो जॉर्जिया येथे होणाऱ्या सराव शिबिरात दाखल होणार होता. पण आपली निवड केवळ सराव शिबिरासाठी झाली आहे. मंगोलियातील ऑलिम्पिकच्या पात्रता कुस्ती स्पर्धेत आपल्या ऐवजी संदीप तोमरला संधी दिली असल्याचे लक्षात येताच राहुलने दिल्ली विमानतळावरूनच परत येण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर राहुलचे प्रशिक्षक काका पवार यांनी काही मल्लांसह माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली. पवारांनी दिल्लीत भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांची मल्लांशी भेट घडवून आणली. प्रशिक्षक काका पवार म्हणाले, ‘केंद्रीय परिवहन नितीन गडकरी यांच्याशी आम्ही दिल्लीत भेटलो. त्यांनी केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अनिल शिरोळे यांनी देखील क्रीडामंत्री; तसेच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनाही या प्रकरणाची कल्पना देण्यात आली. या सर्वांनी महाराष्ट्राचा मल्ल राहुलला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.’ सोमवारी राहुल आवारेने गृह राज्यमंत्री राम शिंदे यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्या वेळी मुख्यमंत्री व केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांची दूरध्वनीवरून चर्चा झाली. या वेळी सोनोवाल यांनी आवारेला मंगोलियाला पाठविणार असल्याचे स्पष्ट केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनोवाल यांनी स्पोर्टस अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियाच्या (साई) अधिकाऱ्यांना आवारेच्या मंगोलिया येथील सहभागाबाबतचे पत्र देण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे, तर संघटनेने पत्र दिले नाही, तर मी माझ्या विशेष अधिकारात त्याला स्पर्धेत सहभागी होण्याचे पत्र देईल, असेही सोनोवाल यांनी सुनावले.

विमानतळावरून परतणे चुकीचे

भारतीय कुस्तीगीर संघटनेने राहुलच्या बेशिस्तपणाची तक्रारही केली. त्याने कुणालाही कल्पना न देता दिल्ली विमानतळावरून परत येण्याचा निर्णय घेतला. त्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचाही इशारा संघटनेने दिला होता. पण राहुलने संदीप तोमर आणि अमित दाहिया यांना राष्ट्रीय निवड शिबिरात पराभूत केले असल्याने राहुलला प्रथम प्राधान्य देण्याचा मुद्दा काका पवार यांच्याकडून मांडण्यात आला. मंगोलियातील स्पर्धा २२ ते २४ एप्रिलदरम्यान होणार आहे. यानंतर शेवटची पात्रता स्पर्धा ६ ते ८ मेदरम्यान तुर्कीत होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज