अ‍ॅपशहर

चपात्या लाटण्यामधून रुग्णांची सुटका

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात ऑटोमॅटिक चपाती बनविण्याचे मशिन सुरू झाल्यामुळे महिला मनोरुग्णांची चपाती लाटण्यातून सुटका झाली आहे.

Maharashtra Times 4 May 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, येरवडा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yerwada news pune
चपात्या लाटण्यामधून रुग्णांची सुटका


येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात ऑटोमॅटिक चपाती बनविण्याचे मशिन सुरू झाल्यामुळे महिला मनोरुग्णांची चपाती लाटण्यातून सुटका झाली आहे. त्यामुळे दीड हजार रुग्णांना आता स्वच्छ आणि दर्जेदार चपात्या मिळू लागल्या आहेत.

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयामधील स्वयंपाकगृहातील चपाती बनविण्याची मशिन सुरू न झाल्याने महिला रुग्णांना दररोज सात हजार चपात्या लाटाव्या लागत होत्या. याबाबत ‘महाराष्ट टाइम्स’ने शुक्रवारी (२८ एप्रिल) वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाकडून दिल्लीहून आलेली नवीन मशिन एकत्रित तयार (असेंबल) करून शनिवारपासूनच मशिनवर चपात्या बनविण्याचे काम सुरू करण्यात आले.

आशिया खंडातील सर्वांत मोठ्या येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात सोळाशेहून अधिक पुरुष आणि महिला मनोरुग्ण उपचारांसाठी आहेत. या रुग्णांना दररोज सकाळी आणि रात्री दोन वेळचे जेवण तयार करावे लागते. साधारण सात हजार चपात्यांची दोन्ही वेळेसाठी गरज भासते. आमदार जगदीश मुळीक यांनी आमदार निधीतून मशिनीसाठी पंधरा लाखांचा निधी मंजूर केला. काही दिवसांपूर्वीच मशिनची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराने चपाती बनविण्याची मशिन प्रशासनाकडे सुपूर्द केली. पण, मशिनीमधून लहान आकाराच्या चपाती निघत असल्याने प्रशासनाने मशिन बदलून देण्याची सूचना केली होती. त्यामुळे महिन्याभरापासून मशिन बंद अवस्थेत होती. त्यामुळे महिला रुग्णांनाच सकाळ आणि रात्रीच्या जेवणासाठी सुमारे सात हजार चपात्या लाटाव्या लागत होत्या.

तासाला हजार चपात्या

मनोरुग्णालयातील स्वयंपाकगृहात शनिवारी सकाळी नवीन मशिन एकत्रित करून चपाती बनविण्यासाठी मशिन सुरू करण्यात आले. मशिन सुरू झाल्याने महिला रुग्णांना दररोज सात हजार चपात्या लाटण्याच्या शिक्षेतून तूर्तास तरी सुटका मिळाली आहे. एका तासाला मशिनीमधून नऊशे ते हजार चपात्या बनतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज