पिंपरी : जुन्या भांडणातून चौघांनी एका तरुणाला सिमेंटच्या गट्टुने बेदम मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला अटक केली असून, त्याचे इतर तीन साथीदार पसार झाले आहेत. बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास नवी सांगवीतील एम. के. चौकात ही घटना घडली.
ओंकार किसन शिंगारे (वय १९ रा. पिंपळे गुरव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रसाद सोनटक्के, प्रथम धरमे यांच्यासह दोघांनावर गुन्हा दाखल केला असून, प्रसाद सोनटक्के याला पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार बुधवारी सायंकाळी एमके चौकातील पानटपरीजवळ थांबला होता. त्या वेळी आरोपींनी पूर्ववैमनस्यातून ओंकारशी वाद घालण्यास सुरुवात केली व नंतर त्याला बेदम मारहाण केली. सहायक पोलिस निरीक्षक एस. ए. निकुंभ तपास करीत आहेत.
--