अ‍ॅपशहर

तुमच्या नातेवाईकाचे आताच निधन झाले; फेसबुकवर असा मेसेज दिसल्यास चुकूनही क्लिक करू नका, अन्यथा...

Facebook Messenger : कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, तसेच शंका आल्यास संबंधित संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीशी थेट संपर्क साधून खातरजमा करावी,असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Edited byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jun 2023, 1:22 pm

हायलाइट्स:

  • फसवा संदेश पाठवून त्याद्वारे फेसबुकच्या वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरीला
  • नव्या 'मालवेअर'मुळे लाखो वापरकर्ते हैराण
  • वापरकर्त्याच्या अन्य समाजमाध्यमांच्या खात्यांमधील माहितीही चोरण्यात येते
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम facebook message
फेसबुक मेसेज
वृत्तसंस्था, सिडनी : 'तुमच्या ओळखीच्या कोणा व्यक्तीचे आताच निधन झाले आहे, ते पाहा,' असा फसवा संदेश पाठवून त्याद्वारे फेसबुकच्या वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरणाऱ्या आणि पैशांना गंडा घालणाऱ्या नव्या 'मालवेअर'मुळे लाखो वापरकर्ते हैराण झाले आहेत. अशा प्रकारच्या संदेशापासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये फेसबुकच्या वापरकर्त्यांना थेट संदेश (डीएम) येतो. त्यामध्ये 'तुमच्या ओळखीच्या कोणाचे नुकतेच निधन झाले आहे आहे,' असा उल्लेख करून तपशीलासाठी 'लिंक'वर 'क्लिक' करण्यास सांगितले जाते. संबंधित तपशील पाहण्यासाठी फेसबुक यूजरनेम आणि पासवर्ड टाकण्यास सांगितला जातो. मात्र, तसे केल्यास वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरीला जाते; तसेच पैशांनाही गंडा घातला जातो, असे आढळून आले आहे. त्याबरोबरच हे हॅकर या खात्याचा ताबा घेतात आणि त्यांच्याकडून संबंधित वापरकर्त्याच्या फ्रेंडलिस्टमधील इतरांना त्याच्या नावाने तसाच संदेश पाठविला जातो. फेसबुक खात्यातील अन्य माहितीचा (जन्मतारीख, इमेल ॲड्रेस, दूरध्वनी क्रमांक) वापर करून वापरकर्त्याच्या अन्य समाजमाध्यमांच्या खात्यांमधील माहितीही चोरण्यात येत आहे. अनेकदा अशा खात्यांमध्ये बँक खात्यांचे किंवा अन्य आर्थिक तपशील असल्याने पैसे चोरीला जाण्याचा धोका असतो.



दादा, मुलाच्या लग्नाला येऊ नकोस, मला दंड करतील, जात पंचायतीने वाळीत टाकलेल्या भावाला बहिणीचे पत्र

अशा प्रकारच्या कोणत्याही संशयास्पद लिंक वर क्लिक करू नये, शंका आल्यास संबंधित संदेश पाठविणाऱ्या व्यक्तींशी थेट दूरध्वनीवर संपर्क साधून खातरजमा करून घ्यावी,असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

फसवणुकीच्या या प्रकारातून गेल्या पाच महिन्यांत ऑस्ट्रेलियातील वापरकर्त्यांनी सुमारे सव्वा कोटी डॉलर गमावल्याची माहिती ऑस्ट्रेलियन कॉम्पिटिशन अँड कन्झ्युमर कमिशनकडून देण्यात आली आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये अशाच मेटा कंपनीच्या कोणा ना कोणा प्लॅटफॉर्मद्वारे दर सात मिनिटांत एक वापरकर्ता ऑनलाइन शॉपिंग घोटाळ्यांना बळी पडत असल्याचा अहवाल आला आहे. त्यातून दर आठवड्यास सुमारे पाच लाख पौंडांचा फटका ग्राहकांना बसत असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. तेथील लॉइड्स बँकिंग ग्रुपच्या अंदाजानुसार या ऑनलाइन शॉपिंग घोटाळ्यांपैकी सुमारे ७० टक्के प्रकार हे फेसबुक किंवा इन्स्टाग्रामशी संबंधित आहेत.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख