अ‍ॅपशहर

तळीयेतील ग्रामस्थांची धास्ती वाढली! डोंगराला आणखी भेगा

दरडग्रस्त तळीये गावातील ग्रामस्थांची भीती अद्याप कमी झालेली नाही. ज्या डोंगरावर हे गाव वसले होते त्या डोंगराला पुन्हा भेगा पडत आहेत

Authored byशर्मिला कलगुटकर | महाराष्ट्र टाइम्स 3 Aug 2021, 8:28 am
महाड : दरडग्रस्त तळीये गावातील ग्रामस्थांची भीती अद्याप कमी झालेली नाही. ज्या डोंगरावर हे गाव वसले होते त्या डोंगराला पुन्हा भेगा पडत आहेत. या भेगा तीन ते साडेतीन किलोमीटर इतक्या लांबीच्या असून तीन ते चार फूट खोल असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरड कोसळल्यानंतर जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या इतर वाडीतील ग्रामस्थांची धास्ती यामुळे वाढली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम तळीयेतील ग्रामस्थांची धास्ती वाढली! डोंगराला आणखी भेगा


गावचे सरपंच संपत तांदलेकर यांनी ही बाब संबंधित यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिल्याचे 'मटा'ला सांगितले. दुर्घटनाग्रस्त वरची वाडी वगळता मधली, शिंदे आणि तुंबेले वाडीमध्ये आजही ग्रामस्थ राहतात. डोंगराला गेलेल्या भेगा पाहता या ग्रामस्थांनी देखील येथे राहणे सुरक्षित नाही. त्यामुळे त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही दुर्घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी डोंगराची पुन्हा एकदा पाहणी केली. काही ठिकाणी माती वाहून गेली आहे, दगड निघाले आहेत. झाडे उन्मळून पडली आहेत. शिवाय डोंगराला मोठ्या भेगा पडत असल्याचे पाहून ग्रामस्थ धास्तावले आहेत. मधल्या वाडीसह शिंदे वाडी सुरक्षित आहे, असा त्यांचा समज होता. अन्य ठिकाणी पर्यायी निवारा नसल्यामुळे हे ग्रामस्थ दिवसभर स्वतःच्या घरी थांबतात व रात्री झोपण्यासाठी नातलगांकडे जातात. नातलग असले तरी त्यांना रोज त्रास देणे योग्य वाटत नसल्याची भावना स्थानिक सुरेश निकम यांनी व्यक्त केली. वरच्या वाडीतील ग्रामस्थांना पंच समिती, वाड्यांमधील सदस्य, सरपंच यांनी स्थापन केलेल्या समितीने चर्चेअंती सुतारकोंडमध्ये आश्रय दिला आहे. या ठिकाणी पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध असली तरीही तिथे कायमस्वरूपी गाव वसवण्याची ग्रामस्थांची तयारी नाही. गावातील समिती, मुंबई ग्रामस्थ मंडळ यांच्यामध्ये या मुद्द्यावर एकमत होणे गरजेचे असल्याचे स्थानिकांना वाटते. सुतारकोंड ही जागा सुरक्षित असली तरीही तेथून शेतीचे अंतर दूर आहे. गुरांची देखभाल, शेतीकामे करण्यासाठी घर व शेती जवळ हवी, पाण्याची मुबलक उपलब्धता हवी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

पुनर्वसन ग्रामस्थांच्या मनाविरुद्ध नाही

म्हाडाने येथे पुनर्वसन करण्याची तयारी दर्शवली आहे, तर काही स्थानिकांनी पुढाकार घेऊन जमिनी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणा ग्रामस्थांशी चर्चा करून पुनर्वसनाची प्रक्रिया सर्वानुमते व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. या ग्रामस्थांचे पुनर्वसन कोणत्या जागी करावे यासंदर्भात चर्चा सुरू आहे. संपूर्ण गाव तीस एकर जमिनीवर वसू शकते. मात्र आता गावकऱ्यांची मनस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या मनाविरुद्ध काहीही करता येणार नाही, याकडे सरपंच संपत यांनी लक्ष वेधले.
लेखकाबद्दल
शर्मिला कलगुटकर
शर्मिला कलगुटकर या महाराष्ट्र टाइम्स च्या मुंबई आवृत्तीमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. त्यांना पत्रकारितेमध्ये २१ वर्षाचा अनुभव आहे. त्या आरोग्य, सामाजिक, जेंडर अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्यापूर्ण लिखाण आणि वार्तांकन करतात. आरोग्यक्षेत्रातील अनेक गैरप्रकारांना त्यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. या कार्याची दखल घेत त्यांना पत्रकारितेतील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज