अ‍ॅपशहर

सगळे मिळेल, पण हक्काची माणसे कठून मिळणार?; तळीयेतील ग्रामस्थांचा आक्रोश

तळीये गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जे बचावले त्यांच्या कुटुंबावर काळाने आघात केला. 'वाचलो म्हणून निसर्गाचे आभार कसे मानावे?

Authored byशर्मिला कलगुटकर | महाराष्ट्र टाइम्स 28 Jul 2021, 7:43 am
तळीये गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जे बचावले त्यांच्या कुटुंबावर काळाने आघात केला. 'वाचलो म्हणून निसर्गाचे आभार कसे मानावे? मायेची माणसे गेली, घरे कोसळली, शेती गेली, सगळे मिळेल पण हक्काची माणसे कुठून मिळणार', ही वेदना या दुर्घटनेतून वाचलेल्या व्यक्तींच्या काळजात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम मरणप्राय वेदना


'मटा'ने मंगळवारी या गावाला भेट दिली. दुर्घटनेच्या जबरदस्त धक्क्यातून येथील रहिवासी अद्याप सावरले नसल्याचे दिसून आले. सुन्न वातावरण, रडूनरडून सुजलेले डोळे, नेसत्या कपड्यानिशी येथील शाळेत हे लोक थांबले आहेत. मुंबई, पुणे येथे कामानिमित्त असलेले नातलग भेटायला आल्यानंतर ते आपल्या दुःखाला वाट मोकळी करून देत होते. दशरथ सनस हे जन्मापासून याच गावात राहतात. दरड कोसळली त्यादिवशी दुपारी ते घरात झोपले होते. वाडीतील काही मुलांच्या आवाजाने त्यांना जाग आली. त्यांनी घराबाहेर पाहिले तर माती, दगडाचा लोट खाली येताना दिसला. अंगावरच्या कपड्यांसह कुटुंबातल्या, वाडीतल्या एकूण १४ जणांना घेऊन ते वेगाने खाली उतरले. मागे वळून पाहिले तर होत्याचे नव्हते झाले होते. काही दिवसांपूर्वी येथे कीर्तन उत्सव झाला होता . त्यात सहभागी झालेल्या गावकऱ्यांचे व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहून हे ग्रामस्थ हमसून हमसून रडत होते.

दोन महिन्यांपूर्वी लग्न होऊन अंबरनाथला राहायला गेलेल्या प्रिया सोगाळकर ही काही दिवस येथे राहून पुन्हा सासरी गेली. आई-वडील आणि तिचा २२ वर्षांच्या भावाला तिने गमावले. भावाला सैन्यात जायचे होते. डोंगरावरचा लेक म्हणून तो या वाडीचे कायम कौतुक करायचा. आज काय होऊन बसले, या प्रियाच्या प्रश्नाचे उत्तर कोणाजवळ नाही.

कोंडाळकर कुटुंबातील १४ वर्षांच्या अक्षिताला व तिच्या लहान भावाला तिच्या ताईने वाचवले. डोंगरावरून माती पडत असल्याचे लक्षात आल्यावर तिने या दोन्ही भावंडांना घरातून बाहेर काढले. मुलांनाही या दुर्घटनेचा इतका जबरदस्त धक्का बसला आहे, की मागील चार दिवसांत ही मुले झोपलेली नाहीत. काही खात नाहीत आणि भेदरून रडत देखील नाहीत.

ते हाका मारत होते...

दुर्घटना झाल्यानंतर तात्काळ मदत मिळाली असती तर अनेकांचे प्राण वाचले असते ही सल प्रत्येक गावकऱ्याच्या मनात आहे. आठ ते नऊ तास चिखलात रुतलेले अनेकजण हाका मारत होते. त्या चिखल-गाळातून अनेकांनी त्यांना काढण्याचा प्रयत्नदेखील केला, पण रात्री काळोखात ते शक्य झाले नाही. जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेणाऱ्या स्वप्नील शिरवळ (२६) यांच्यासोबत त्यांचा भाऊ शेजारी अर्धवट गाळात रुतला होता. स्वप्नील त्याला हाका मारत होता. घाबरू नको, कोणीतरी येईल, मदत मिळेल, धीर धर असे सांगत होता. पण काही वेळाने स्वप्नीलच्या भावाचा आवाज क्षीण होत गेला. रात्री त्याचा मृतदेह सापडला!
लेखकाबद्दल
शर्मिला कलगुटकर
शर्मिला कलगुटकर या महाराष्ट्र टाइम्स च्या मुंबई आवृत्तीमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. त्यांना पत्रकारितेमध्ये २१ वर्षाचा अनुभव आहे. त्या आरोग्य, सामाजिक, जेंडर अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्यापूर्ण लिखाण आणि वार्तांकन करतात. आरोग्यक्षेत्रातील अनेक गैरप्रकारांना त्यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. या कार्याची दखल घेत त्यांना पत्रकारितेतील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज