अ‍ॅपशहर

कणकवलीच्या सभेत मुख्यमंत्री कोणाच्या विरोधात बोलणार?

महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष भाजप व शिवसेनेचे उमेदवार समोरासमोर असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. शिवसेनेनं इथं खुलेआम भाजपच्या नीतेश राणे यांच्या विरोधात उमेदवार उतरवल्यानं फडणवीस नेमके कोणाच्या विरोधात आणि काय बोलणार, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Oct 2019, 1:25 pm
सिंधुदुर्ग: महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष भाजप व शिवसेनेचे उमेदवार समोरासमोर असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. शिवसेनेनं इथं खुलेआम भाजपच्या नीतेश राणे यांच्या विरोधात उमेदवार उतरवल्यानं फडणवीस नेमके कोणाच्या विरोधात आणि काय बोलणार, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cm devendra fadnavis to address public rally in kankavli for bjp candidate nitesh rane
कणकवलीच्या सभेत मुख्यमंत्री कोणाच्या विरोधात बोलणार?


भाजप-शिवसेनेची युती झाल्यानंतरही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बंडखोरी करत एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. बहुतेक ठिकाणी बंडखोर हे अपक्ष किंवा अन्य पक्षाच्या तिकिटांवर लढत आहेत. सिंधुदुर्गातील परिस्थिती मात्र वेगळी आहे. येथील कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार नीतेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेनं अधिकृतरित्या सतीश सावंत यांना रिंगणात उतरवले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून जिल्ह्यातील कुडाळ व सावंतवाडी मतदारसंघात भाजपनं बंडखोर उमेदवार उतरवत शिवसेनेला आव्हान दिलं आहे. त्यामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता युती तुटल्यात जमा आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तिथं जाहीर सभा घेणार आहेत. ते शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात बोलणार का, याबद्दल उत्सुकता आहे.

उद्धव ठाकरे देखील सभा घेणार

'ज्या मतदारसंघात वाद आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवार आहेत, तिथं सर्वोच्च नेत्यांनी जाऊ नये, असा अलिखित करार आहे. तो दोन्हीकडून पाळला जाईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी कणकवली किंवा सिंधुदुर्गात सभा घेतली तर उद्धव ठाकरे सुद्धा सभा घेतील,' अशी भूमिका शिवसेनेनं याआधीच मांडली आहे. मात्र, आज मुख्यमंत्री कणकवलीत जाहीर सभेला संबोधित करणार असल्यानं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील सभा घेतील, हे जवळपास निश्चित झालं आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.

निवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर

अशी होतेय निवडणूक

२७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना
४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत
५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी
७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत
२१ ऑक्टोबर : मतदान
२४ ऑक्टोबर : मतमोजणी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज