अ‍ॅपशहर

करोना संकट: रत्नागिरीत उसळली मुंबईकरांची गर्दी; प्रशासन हतबल

मुंबई, ठाणे यासह विविध भागांतून चाकरमानी कुटुंब कबिल्यासह कोकणात निघाले असून रत्नागिरीत अचानक मोठ्या संख्येने लोक धडकल्याने प्रशासन पुरतं हादरलं आहे. रत्नागिरीत येणारे लोंढे आवरताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 May 2020, 9:17 am
रत्नागिरी: मुंबई, ठाणे परिसरात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने येथून मोठ्या संख्येने लोक गावाकडे निघाले असून रत्नागिरीत गेल्या काही दिवसांत मुंबई परिसरातून येणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. अचानक उसळलेल्या या गर्दीने प्रशासनावर मोठा ताण आला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात चालली आहे. याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ratnagiri-migrants


मुंबई व इतर जिल्ह्यांतून रत्नागिरीत प्रचंड संख्येने येणाऱ्या लोकांमुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात ४०० करोना पॉझिटिव्ह व १५०० सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. मात्र, दिवसेंदिवस जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे. हे चित्र असेच राहिल्यास व रुग्णालयांतील जागा अपुरी पडल्यास भविष्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांना देखील होम क्वारंटाइन करावे लागू शकते, असे सांगितले जात आहे.

मुंबईतून येणारे ६० टक्के नागरिक पास घेऊन तर ४० टक्के नागरिक कोणतीही परवानगी न घेता येत आहेत. गंभीर बाब म्हणजे मुंबईतून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला कल्पना न देता परस्पर परवानगी दिली गेल्याचेही समोर आले आहे.

शहरातील दुकाने काही नियम व अटींवर सुरू करण्यास परवानगी दिली जाणार असून आता प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर ती उघडायची आहेत. स्वतःची काळजी घेत आता पुढील काळात करोनासोबत जगणे अपरिहार्य आहे, असे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

सांगलीतील लॅबने १७०० स्वॅब नाकारले

रत्नागिरीतून करोना चाचणीसाठी सांगलीतील प्रयोगशाळेत स्वॅब पाठवण्यात येत होते. मात्र, हे स्वॅब आता नाकारण्यात येत असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेपुढे नवा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगलीत जिल्ह्यातून १७०० स्वॅब पाठवण्यात आले होते. मात्र, त्याची तपासणी करण्यास नकार देण्यात आला. याबाबत राज्य सरकारला कळवण्यात आले आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या ४७ वर

जिल्ह्यात करोना रुग्ण वाढत आहेत. सोमवारी सायंकाळी ६ जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यातील ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर १ अहवाल निगेटिव्ह आला आहे. अन्य एक अहवाल अपुरा नमुना असल्याने प्राप्त होऊ शकला नाही. आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये २ रुग्ण रत्नागिरी येथील नर्सिंग सेंटरमधील आहेत तर एक रुग्ण रत्नागिरी परिसरातील रहिवासी आहे. याव्यतिरीक्त लांजा येथील २ लहान मुलांचा (वय ९ व १० वर्षे) अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ४७ झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज