अ‍ॅपशहर

महाडचे शोधकार्य थांबवले

महाड येथील सावित्री नदीवरील पूलाच्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या दोन एसटी बस सापडल्यानंतर, रविवारी आपद‍्ग्रस्त तवेरा गाडीही शोध पथकांना आढळून आली. दुपारी ही गाडी पाण्याबाहेर काढली असता, त्यामध्ये दोन प्रवाशांचे मृतदेहही आढळून आले.

Maharashtra Times 15 Aug 2016, 3:43 am
सुहास बारटक्के, चिपळूण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mahad bridge collapse vehicle wreckage found
महाडचे शोधकार्य थांबवले


महाड येथील सावित्री नदीवरील पूलाच्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या दोन एसटी बस सापडल्यानंतर, रविवारी आपद‍्ग्रस्त तवेरा गाडीही शोध पथकांना आढळून आली. दुपारी ही गाडी पाण्याबाहेर काढली असता, त्यामध्ये दोन प्रवाशांचे मृतदेहही आढळून आले. त्यांची ओळख पटली असून संतोष वाजे व दत्ताराम मिरगल अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, या दुर्घटनेतील सर्व तीनही वाहने सापडल्यानंतर, दुर्घटनेच्या १३व्या दिवशी शोधकार्य थांबवण्यात आले आहे.

सावित्री नदीत वाहून गेलेली राजापूर-बोरीवली ही एसटी बस गुरुवारी सापडली होती. तर जयगड-मुंबई ही दुसरी एसटी बस शनिवारी रात्री पाण्याबाहेर काढण्यात आली होती. या बसमध्ये एकाही प्रवाशाचा मृतदेह किंवा सामान आढळून आले नाही. त्यानंतर रविवारी सकाळी तिसरे आपद्‍ग्रस्त वाहन तवेराचा शोध लागला. तवेरा गाडीमध्ये संतोष वाजे व दत्ताराम मिरगल या प्रवाशांचे मृतदेह आढळून आले. मृतदेहांचे शवविच्छेदन त्याच ठिकाणी करून ते नातेवाइकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गेले १३ दिवस सुरू असलेले शोधकार्य थांबवण्यात आले, मात्र नदीकाठच्या स्थानिरक जनतेच्या वतीने घेतला जाणारा मृतदेहांचा शोध मात्र सुरूच राहणार आहे, अशी माहिती नियंत्रण कक्षप्रमुख सतीश बागल यांनी दिली. एनडीआरएफ, नौदल, कोस्टगार्ड, पोलिस, सरकारी अधिकारी, एसटी कर्मचारी अन्य स्वयंसेवी संस्था यांचे ३०० हून अधिक जण शोधकार्यात सहभागी झाले होते. घटनास्थळाचे मदत केंद्र आणि जिल्हा नियंत्रण कक्षाचे काम आता थांबवण्यात आले आहे. पुढील कारवाई पोलिस कात्यामार्फत केली जाणार आहे.

अद्यापही १२ बेपत्ता

या दुर्घटनेत एकूण ४० व्यक्ती मरण पावल्याची शक्यता असून एकूण २८ मृतदेह हाती लागले आहेत. अद्यापही १२ जण बेपत्ता आहेत. त्यांना पोलिस कारवाईनंतर दोन महिन्यांनंतर मृत घोषित केले जाईल. वास्तविक पाहता बेपत्ता व्यक्तींना मृत घोषित करण्याची प्रक्रिया सहा वर्षांची आहे. मात्र विशेष बाब म्हणून या प्रकरणात बेपत्ता व्यक्तींचा शोध २ महिन्यात पूर्ण करून त्यांना मृत घोषित केले जाईल. त्यानंतर त्यांच्या वारसांना नुकसानभरपाई दिली जाईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज