अ‍ॅपशहर

संसारगाठ पाचव्याच दिवशी सुटली, हळद उतरण्याआधीच नवविवाहितेचा मृत्यू, लग्नघरावर शोककळा

हळद उतरवण्याचा कार्यक्रम होण्यापूर्वी नवविवाहितेची प्रकृती अचानक बिघडली. तिला उलट्या, जुलाब होऊ लागल्याने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. परंतु, तेथे पोहोचण्यापूर्वी ती चक्कर येऊन कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलं

Authored byअनिश बेंद्रे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Feb 2023, 11:40 am
सातारा : आरती आणि सतीश यांच्या शुभविवाहामुळे लग्नघरातील वातावरण खुलून गेलं होतं. नातेवाईकांची लगबगही सुरू होती. दोघांच्या संसाराची रेशीमगाठ बांधली गेली होती. लग्नानंतरचे पारंपरिक विधीवत कार्यक्रमही निर्विघ्न पार पडत होते. पण नियतीने या नवदाम्पत्याच्या रेशीमगाठीत वेगळंच काहीतरी लिहून ठेवलं होतं. रविवारी हळद उतरवण्याचा कार्यक्रम सुरू होता. वातावरण प्रफुल्लित होतं, याच दरम्यान वधू आरती हिची तब्येत अचानक बिघडली. तिला उलट्या, जुलाब होऊ लागल्याने नातेवाईकांची एकच धांदल उडाली. तिला तातडीने उपचारासाठी तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि दोन्ही कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Satara Newly Married Bride Death 630
साताऱ्यात नवविवाहितेचा मृत्यू


महाबळेश्वर तालुक्यातील वाळणे गावातील नवविवाहिता आरती सतीश वाळणेकर (वय २५) हिला उलटी, जुलाब झाले. तिला उपचारासाठी तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जात असतानाच आकस्मिक मृत्यू झाला. लग्नानंतर पाचव्या दिवशी विवाहितेचा मृत्यू झाल्याने वाळणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

महाबळेश्वर पोलिसांनी सांगितले की, महाबळेश्वरपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाळणे या गावात सतीश वाळणेकर यांचे लग्न आरती मुसळे हिच्या सोबत कारगाव (ता. खोपोली, जि. रायगड) या ठिकाणी अवघ्या पाच दिवसांपूर्वी मंगळवार, दि. १४ रोजी झाले होते.

पुण्यात विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं, आईने २० दिवसांनी वही उघडली, हादरवणारं कारण समोर
गुरुवार, दि. १६ रोजी लग्नाची पूजा झाली. रविवार, दि. १९ रोजी हळद उतरवण्याचा कार्यक्रम होता. परंतु, नवविवाहितेची प्रकृती अचानक बिघडली. तिला उलट्या, जुलाब होऊ लागल्याने तिला तापोळा येथे उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. परंतु, तेथे पोहोचण्यापूर्वी ती चक्कर येऊन कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. त्याच अवस्थेत तिला तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तेथून मृतदेह महाबळेश्वर ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. वाळणे येथे दोन्ही कुटूंबाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

आई-बाबांना मदत करण्यास शेतात गेली, १७ वर्षीय युवतीला सर्पदंश, तडफडून प्राण सोडले

दरम्यान, ग्रामीण रुग्णालयामध्ये मृत आरतीच्या नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. दोन्ही कुटुंबांची अवस्था पाहून परिसरातून हळहळ व्यक्त होत होती. घटनास्थळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जानवे-खराडे यांनी नातेवाईकांशी चर्चा केली. महाबळेश्वर पोलिस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जानवे खराडे याच्या मार्गदर्शनाखाली उपपोलिस निरीक्षक इनामदार करीत आहेत.
लेखकाबद्दल
अनिश बेंद्रे
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा 'मास्टरमाईंड' | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव... आणखी वाचा

महत्वाचे लेख