अ‍ॅपशहर

गायीच्या पोटातून काढले मंगळसूत्र

गायीच्या पोटातून गिळलेले मंगळसूत्र व सोन्याचे इतर दागिने बाहेर काढण्यात येथील सरकारी पशू चिकित्सालयातील डॉक्टरांना यश आले. अशा प्रकारची शस्त्रक्रिया कराडमध्ये प्रथमच झाली आहे.

Maharashtra Times 27 Jul 2017, 12:03 am
कराड : गायीच्या पोटातून गिळलेले मंगळसूत्र व सोन्याचे इतर दागिने बाहेर काढण्यात येथील सरकारी पशू चिकित्सालयातील डॉक्टरांना यश आले. अशा प्रकारची शस्त्रक्रिया कराडमध्ये प्रथमच झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mangal sutra removed from cows stomach in karad
गायीच्या पोटातून काढले मंगळसूत्र

डॉ. अंकुश परिहार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली. पाटण तालुकयातील चाफळ खोऱ्यातील पाडळोशी गावातील शेतकरी व्यंकटराव जगन्नाथ पाटील यांच्या मालकीची ही गाय आहे. शस्त्रक्रियेनंतर गायीची प्रकृती उत्तम आहे.
पाडळोशी गाव दुर्गम भागात असून, तेथे चोऱ्यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे दागिने वा रोख रक्कम लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने लपवून ठेवली जाते. पाटील यांच्या पत्नीने मंगळवारी रात्री झोपण्याआधी तीन तोळे सोन्याचे मणी मंगळसूत्र गंठण घरातील ड्रममध्ये ठेवलेल्या असलेल्या पशुखाद्यामध्ये लपवून ठेवले होते. बुधवारी सकाळी घरातील महिला स्वयंपाकाच्या घाईगडबडीत असतानाच, घरातील पुरुष मंडळींनी ड्रममधील पशुखाद्य घमेल्यात काढून ते आपल्या दोन गायींना खाण्यासाठी गायींच्या गव्हाणीत ठेवले. याच खाद्यावाटे ड्रममध्ये ठेवलेले गंठण दोन्हींपैकी एका गायीपुढे ठेवलेल्या घमेल्यात गेले होते. दोन्ही गायींनी समोर ठेवलेले सर्व पशुखाद्य संपवले.
घरातील महिलांनी गडबड आटोपल्यानंतर पशुखाद्य ड्रममधील गंठण शोधण्याचा प्रयत्न केला असता, तेथे गंठण सापडले नाही. त्यामुळे पाटील यांच्या पत्नीने घरी विचारणा केली. त्यानंतर गायीच्या पोटात दागिना गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ चाफळ (ता. पाटण) येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेतला असता त्यांनी दोन्ही गायींच्या पोटाचा एक्स रे काढण्यासाठी कराडच्या शासकीय पशुवैद्यकिय चिकित्सालयात गायीला नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार व्यंकटराव पाटील यांनी आपल्या दोन्ही गायींसह येथील शासकिय पशुवैद्यकिय चिकित्सालय गाठले. येथील वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश परिहार यांनी तातडीने हालचाली करत प्रथम दोन्ही गायींच्या पोटांचा एक्स रे घेऊन कोणत्या गायीच्या पोटात दागिना आहे, ते पाहिले. एका गायीच्या पोटात गंठण असल्याचे एक्स रे चाचणीत दिसले.
त्यानंतर परिहार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दोन तास त्या गायीच्या पोटाची शस्त्रक्रिया करून गंठण बाहेर काढले. सध्या ही गायीवर येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात उपचार सुरू आहेत. गायीची प्रकृती स्थिर असून, ती सुखरूप असल्याचा निर्वाळा डॉ. परिहार यांनी दिला.

दुर्मिळ व किचकट शस्त्रक्रिया

जनावरांच्या चाऱ्यातून अथवा खाद्यातून आजपर्यंत खिळे, लोखंडी तुकडे गेल्याच्या घटना घडल्याने ते पोटातून काढण्यासाठी अनेक जनावरांच्या शस्त्रक्रिया आपण केल्या आहेत. मात्र एखाद्या जनावराने सोने गिळल्याचा हा दुर्मिळ प्रसंग असल्याने व याचा गायीच्या प्रकृतीवरही अनिष्ट परिणाम होण्याचा धोका होता. जनावरांनी खाद्यावाटे खाल्लेल्या वस्तू शौचावाटे बाहेर पडत नाहीत. जनांवरांच्या जठरात विविध कप्पे असतात, त्यातून ती वस्तू शोधून काढण्यासाठीची ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते. पोटात गेलेली वस्तू लोखंड आहे की सोने यापेक्षा ती बाहेर काढणे आवश्यक असते. अन्यथा जनांवरांच्या जीवाला धोका निर्माण होतो. या शस्त्रक्रियेत गायीचा जीव वाचविण्याबरोबर काबाडकष्ट करून मिळविलेली मौल्यवान वस्तूही मिळाल्याने वेगळेच समाधान मिळाले, अशी प्रतिक्रिया डॉ. परिहार यांनी व्यक्त केली. गायमालक व्यंकटराव पाटील यांनीही समाधान व्यक्त केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज