अ‍ॅपशहर

संतोष पोळला कळंबा कारागृहात हलविणार

सिरियल किलर संतोष पोळच्या सुरक्षिततेला जिल्हा कारागृहात धोका होण्याची शक्यता असल्याने त्याची रवानगी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात करण्यात येणार आहे. तेथे त्याला स्वतंत्र बराकीत ठेवण्यात येणार आहे. तो तीन गार्ड आणि चोवीस तास सीसीटीव्हीच्या नजरेखाली असणार आहे.

Maharashtra Times 29 Aug 2016, 11:23 pm
महाराष्ट्र टाइम्स.कॉम santosh pol wai murder issue
संतोष पोळला कळंबा कारागृहात हलविणार


म. टा. वृत्तसेवा, सातारा

सिरियल किलर संतोष पोळच्या सुरक्षिततेला जिल्हा कारागृहात धोका होण्याची शक्यता असल्याने त्याची रवानगी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात करण्यात येणार आहे. तेथे त्याला स्वतंत्र बराकीत ठेवण्यात येणार आहे. तो तीन गार्ड आणि चोवीस तास सीसीटीव्हीच्या नजरेखाली असणार आहे.

संतोष पोळने केलेल्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. संताप आणि रोष प्रचंड वाढलेला आहे. अनेकांनी त्याला फासावर लटकविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे. जिल्हा मध्यवर्ती कारागृहातही बंदिवानांमध्ये संतोष पोळच्या कृत्याबाबत तीव्र संताप आहे. त्यामुळे संतोष पोळला जर जिल्हा कारागृहात ठेवले तर इतर बंदिवानांकडून त्याच्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे कारागृह अधीक्षक एन. एन. चोंधे यांनी खबरदारी म्हणून संतोष पोळला ‘हाय सिक्युरिटी जेल’मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा कारागृहात अशा प्रकारच्या सिरियल किलरला ठेवण्याची स्वतंत्र जागा नाही. त्यामुळे कोल्हापूर येथील कळंबा जेलमध्ये त्याच्यासाठी स्वतंत्र बराकीची सोय करण्यात आली आहे. तीन गार्ड आणि सीसीटीव्हीच्या देखरेखीत तो राहणार आहे. तेथील त्याची वर्तणूक कशी आहे, हे सर्व तेथील कारागृह प्रशासन अधिकारी आणि पोलिस अधीक्षक पाहणार आहेत. संतोषची साथीदार ज्योती मांढरेलाही कळंबा जेलमध्येच ठेवण्यात येणार आहे.

संतोषचा गाळा आठ वर्षांपासून बंद

संतोष पोळने खून केलेले मृतदेह त्याचे घर किंवा फार्म हाउसवर पुरले होते, ही धक्कादायक माहिती समोर येत असतानाच संतोष पोळच्या एका गाळ्यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. धोम ग्रामपंचायतीचा गाळा त्याने ताब्यात घेतल्यापासून गेली आठ वर्षे बंद आहे. त्यामुळे संतोषबरोबर त्याची स्थावर मालमत्ताही चर्चेत आली आहे. संतोषने तो गाळा २००८मध्ये ताब्यात घेतला आहे. मात्र, गाळ्याचा ताबा घेतल्यापासून तो बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज