अ‍ॅपशहर

बिल्डिंग उदयनराजेंची पण त्यांचंच चित्र काढायला पोलिसांचा विरोध, कोणत्या अदृश्य शक्तीचा दबाव?

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या मालकी हक्काची इमारत असूनही त्यांच्याच इमारतीवर त्यांचंच चित्र काढण्यास साताऱ्याचे पोलीस विरोध करत आहेत. संबंधित चित्रकाराला पोलिसांनी ताब्यात घेत चित्र काढण्यास परवानगी नाकारली. पोलिसांवर कोणत्या अदृश्य शक्तीचा दबाव आहे, अशी चर्चा यानिमित्ताने साताऱ्याच्या नाक्या-नाक्यावर सुरु आहे.

Authored byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Mar 2023, 4:48 pm
सातारा : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील 'कोयना दौलत' या निवासस्थानानजीक खासदार उदयनराजे यांची मालकी असलेल्या इमारतीच्या भिंतीवर सोमवारी रात्री क्रेनच्या साहाय्याने पेंटिंग काढण्यात येणार होते. मात्र सातारा पोलिसांनी हे पेंटिंग काढण्यास विरोध करत संबंधित क्रेन आणि उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना मज्जाव केल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उदयनराजेंच्या मालकीची इमारत असतानाही त्यांचंच चित्र काढण्यास पोलीस कुणाच्या आदेशाने विरोध करतायेत? पोलिसांवर कोणत्या अदृश्य शक्तीचा दबाव आहे?अशी चर्चा साताऱ्याच्या नाक्या-नाक्यावर सुरु आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Satara police oppose painter over paint udyanraje bhosale picture
उदयनराजे भोसले


पोलिसांच्या कारवाईनंतर आज सकाळी पेंटरकडून पुन्हा पेंटिंग काढण्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु काही वेळातच पेंटरला पोलिसांनी पुन्हा काम थांबवण्यास सांगितले. त्यावेळी पोलीस व पेंटर पाटोळे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पोलिसांनी पेंटरला ताब्यात घेतल्याने तिथे काही वेळ तणाव निर्माण झाला. पेंटिंग काढू न दिल्यास इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा देखील पेंटरने दिला आहे.

ज्या इमारतीवर उदयनराजेंचे चित्र काढण्यात येणार आहे, त्या इमारतीची मालकी उदयनराजेंकडे आहे, असे प्रीतम कळस्कर यांनी सांगितले. पेटिंग करणाऱ्या पेंटरला खाली उतरवल्यानंतर पोलीस मुख्यालयात उदयनराजे समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

उदयनराजे भोसले हे माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांचे चित्र काढले तरी मला आनंदच आहे. यात काय वाईट वाटण्यासारखी काहीच नाही, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली होती. मात्र शंभूराजे यांच्याच दबावावरुन पोलीस हे पेंटिंग करण्याला विरोध करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात साताऱ्यात सुरु आहे.

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांचं चित्र काढण्यावरुन उदयनराजे यांचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलाच वाद पाहायला मिळतोय. मंत्री शंभुराज देसाई यांनी यावर प्रतिक्रिया देत कोणतही विनापरवाना कृत्य साताऱ्यात सहन केलं जाणार नाही. वेळ प्रसंगी कायद्याचा वापर करावा लागला तरी चालेल, असा इशारा दिलाय. मात्र, याच विषयावर उदयनराजेंचे कार्यकर्ते शंभुराज देसाई यांच्या सोबत चर्चेसाठी आले असताना शंभुराज देसाई यांनी त्यांची भेट घेण्याचं टाळलं.
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख