अ‍ॅपशहर

Nitesh Rane:नितेश राणेंच्या जामिनाचा निर्णय लांबणीवर; वकिलांचा युक्तिवाद पूर्ण, उद्या निकाल

या सुनावणीदरम्यान नितेश राणे यांचे वकील सतीश मानशिंदे आणि सरकारी वकील प्रदीप घरत यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. नितेश राणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार न्यायालयालासमोर हजर झाले आहेत. त्यांनी शरण अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे जामिनाचा निर्णय होईपर्यंत नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवावे, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Jan 2022, 5:31 pm

हायलाइट्स:

  • नितेश राणे यांच्या जामिनाचा फैसला उद्या होणार
  • संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणेंना जेल की बेल
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Nitesh-Rane-Nilesh-Rane
या सुनावणीदरम्यान नितेश राणे यांचे वकील सतीश मानशिंदे आणि सरकारी वकील प्रदीप घरत यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला.
सिंधुदुर्ग: संतोष परब हल्लाप्रकरणाच्या कटात सहभागी असल्याचा ठपका असलेले भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामिनाबाबतचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडला आहे. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. सत्र न्यायालयात दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सुनावणी तहकूब करण्यात आली. आता मंगळवारी दुपारी तीन वाजता न्यायाधीशांकडून नितेश राणे यांच्या जामिनाबाबत अंतिम निर्णय दिला जाईल.
या सुनावणीदरम्यान नितेश राणे यांचे वकील सतीश मानशिंदे आणि सरकारी वकील प्रदीप घरत यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. नितेश राणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार न्यायालयालासमोर हजर झाले आहेत. त्यांनी शरण अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे जामिनाचा निर्णय होईपर्यंत नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवावे, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. परंतु, नितेश राणे यांचे वकील सतिश मानशिंदे यांनी त्याला विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला कायदेशीर प्रक्रियेसाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. गेल्या तीन दिवसांत नितेश राणे कणकवली पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी नितेश राणे यांनी पोलिसांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे आता त्यांच्या पोलीस कोठडीची का गरज आहे, असा सवाल सतीश मानशिंदे यांनी विचारला. सत्र न्यायालयात दोन्ही बाजूच्या वकिलांनी तब्बल साडेपाच तास युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्तींनी जामिनाचा निकाल मंगळवारी दिला जाईल, असे सांगत सुनावणी तहकूब केली.

नितेश राणेंचा फोन स्वीय सहाय्यकाकडे होता?

या सुनावणीदरम्यान संतोष परब यांच्यावरील हल्ल्यावेळी नितेश राणे यांचा फोन त्यांचा स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्याकडे असल्याची माहिती अ‍ॅडव्होकेट सतीश मानशिंदे यांनी दिली. संतोष परब यांच्यावर हल्ला करणारा सचिन सातपुते आणि नितेश राणे यांच्या स्वीय सहाय्यक राकेश परब यांचे काय संबंध आहेत, हे आम्हाला माहिती नाही. नितेश राणे यांचा फोन राकेश परब यांच्याजवळ असल्याने त्याने परस्पर मोबाईलचा वापर केला असू शकतो, असे सतीश मानशिंदे यांनी म्हटले. राकेश परब आणि सचिन सातपुते यांच्यात फोनवरुन बोलणे झाले म्हणून नितेश राणे यांचा सचिन सातपुतेंशी संबंध आहे, असा अर्थ काढता येणार नाही. नशीब अशा गुन्ह्यांमध्ये टाडा कायदा लागू होत नाही, अन्यथा पोलिसांनी नितेश राणे यांच्यावर टाडा अंतर्गत गुन्हा दाखल केला असता, असेही सतीश मानशिंदे यांनी म्हटले.

तसेच हल्ल्यादरम्यान संतोष परब यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. एका गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये संतोष परब यांना खरचटण्यापलीकडे जखम झालेली नाही. घटना घडली तेव्हा कारमध्ये दोन व्यक्ती होत्या. मग पोलिसांनी चार जणां ताब्यात कसे घेतले? संतोष परब यांना टाके पडले नाहीत किंवा त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली नाही. हल्ल्यानंतर त्यांनी माध्यमांना लगेच प्रतिक्रिया दिली, असेही अ‍ॅडव्होकेट सतीश मानशिंदे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

कणकवलीत कडेकोट पोलीस बंदोबस्त

दरम्यान, या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कणकवली परिसरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्र न्यायालय असलेल्या ओरोस आणि कणकवली परिसरात भाजप कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कणकवलीत चौकाचौकात पोलिसांच्या तुकड्या दिसत आहेत. याशिवाय, शहरात राज्य राखीव पोलीस दल आणि दंगल नियंत्रण पथकाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.

महत्वाचे लेख