अ‍ॅपशहर

दुसऱ्याचे अडीच कोटी भरता, मग स्वत:ची थकबाकी का भरत नाही; दीपक केसरकरांचा राणेंना सवाल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फॉर्म वैध ठरत असता, तर ते भरू शकले असते. त्याचे नेते करू शकले असते. ते केंद्रात मंत्री आहेत. पण करू शकणार नाहीत, असा टोला आमदार नितेश राणे यांना नाव न घेता आमदार दीपक केसरकरांनी लगावला.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Dec 2021, 4:14 pm
सिंधुदुर्ग: राणे कुटुंबीयांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची लाखो रुपयांची देणी थकवली आहेत. उच्च न्यायालयानेही यावरुन त्यांना फटकारले आहे. आता ते फारतर अमित शाह यांची मदत घेऊन आणखी कर्ज घेतील, आणखी मोठे थकबाकीदार होतील. यापलीकडे त्यांना काहीही जमणार नसल्याचा टोला शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी लगावला. सध्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारामुळे कोकणातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. दीपक केसरकर यांच्या राणे कुटुंबीयांवरील टीकेमुळे हे राजकीय युद्ध आणखीनच तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Kesarkar Rane
तुम्ही दुसऱ्याचे अडीच कोटी भरता, मग तुमची थकबाकी तुम्हाला का भरता येत नाही?, असा सवाल उपस्थित करत दीपक केसरकरांनी नारायण राणेंवर निशाणा साधला.


दीपक केसरकर हे गुरुवारी सिंधुदुर्गातील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्हा बँकेतील राणे कुटुंबीयांच्या कारभारावर ताशेरे ओढले. बँक ही चांगले ठेवीदार आणि कर्जदारांमुळे उभी राहते. मात्र, राणे कुटुंबीयांनीच बँकेचे मोठे कर्ज थकवले आहे. न्यायालयानेही त्यांना तुम्ही चांगले कर्जदार नसल्याचे सुनावले आहे. त्यामुळे मतदारांनी या गोष्टीचा विचार करावा. ज्यांनी बँकेची कर्ज थकवलीत त्यांच्या आवाहनाला मतदारांनी किंमतच देता कामा नये, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.
कोकणात राष्ट्रवादी देणार राणेंना धक्का? जिल्हा बँक निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू
एका दिवसामध्ये ३६ लाख कोणी भरलेत याची चौकशी झालीच पाहिजे. तुम्ही दुसऱ्याचे अडीच कोटी भरता, मग तुमची थकबाकी तुम्हाला का भरता येत नाही?, असा सवाल उपस्थित करत दीपक केसरकरांनी नारायण राणेंवर निशाणा साधला. शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय प्रकाश गवस यांना ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यावरून दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना लक्ष्य केले. याच प्रवेशासाठी एका दिवसात ३६ लाख कोणी भरलेत याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी केसरकर यांनी केली. केसरकर यांनी राणे कुटुंबीयांवर थेट आरोप केल्याने निश्चितच जिल्हा बँक निवडणूकचे वातावरण तापणार आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी स्वतः केसरकर पुन्हा एकदा यावेळी मैदानात उतरून राणेंना उत्तर देण्यासाठी सक्रिय झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

महत्वाचे लेख