अ‍ॅपशहर

'भाजपमधील भटजी सत्तेत, बहुजन अडगळीत!'

भाजपमधील सगळे शेटजी-भटजी आज सत्तेत मिरवत आहेत, तर पक्षाला मोठं करणारे बहुजन नेते अडगळीत गेले आहेत, असा टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Maharashtra Times 19 Oct 2016, 3:58 pm
मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ajit pawar targets bjp
'भाजपमधील भटजी सत्तेत, बहुजन अडगळीत!'


भाजपमधील सगळे शेटजी-भटजी आज सत्तेत मिरवत आहेत, तर पक्षाला मोठं करणारे बहुजन नेते अडगळीत गेले आहेत, असा टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी आणि फडणवीस यांनी शाहू, फुले, आंबेडकरांची विचारसरणी खुंटीला टांगून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.

'भाजप हा शेटजी- भटजींचा पक्ष आहे, असं मी लहानपणी ऐकायचो. आज तेच चित्र प्रत्यक्ष पाहायला मिळतंय. मुंडे, डांगे, फरांदे या नेत्यांनी भाजपला बहुजन चेहरा दिला. भाजप तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवला. पण आता सत्ता आल्यानंतर हे नेते अडगळीत पडलेत आणि गडकरी, जावडेकर, प्रभू आणि पियुष गोयल हे नेते सत्तेत मिरवत आहेत. बहुजन नेत्यांचा, बहुजन समाजाचा भाजप फक्त मतांपुरता वापर करून घेतो, हेच यातून स्पष्ट दिसतं, असं टीकास्त्र अजित पवार यांनी सोडलं. माढा तालुक्यात पिंपळनेर इथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजितदादांनी सरकारवर हल्ला चढवला.

मुख्यमंत्री आणि इतर अनेक मंत्री विदर्भातील असल्यानं ते पश्चिम महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप पवारांनी केला. अॅट्रॉसिटीतील चुकीच्या तरतुदी दुरुस्त करण्याची मोर्चेकऱ्यांची मागणी योग्य असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तसंच, पुण्यातील गुंड बाबा बोडके प्रकरणात मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत, वर्षा बंगल्यावर त्या दोघांची भेट झाली होती, असा दावाही त्यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज