अ‍ॅपशहर

Solapur : वधू-वर परिचय मेळाव्यात वधूच दाखवली नाही; शेकडो लग्नाळू तरुणांची मोठी आर्थिक फसवणूक

Solapur Vadhu Var Suchak Mandal Scam: सोलापुरात वधू वर परिचय मेळाव्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. वधू वर मंडळाने वधूच दाखवली नाही. यामुळे मेळाव्यात गोंधळाचं वातावरण होतं. काहीतरी गडबड असल्याचा संशय लग्नाळू तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आला. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर बार्शीत रजिस्ट्रेशनच्या नावाखाली शेकडो लग्नाळू तरुणांची फसवणूक केल्याची बाब उघड झाली.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jan 2023, 5:56 pm
सोलापूर : बार्शी शहरात शेकडो लग्नाळू तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कथित वधू वर मंडळाकडून हजारो रुपयांची फी घेऊन त्यांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. वधू वर परिचय मेळाव्यात वधूच दिसली नाही. यामुळे लग्नाळू तरुण आणि पालकांनी संताप व्यक्त करत बार्शी शहर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी कथित वधू वर मंडळ चालक, महिला आणि एजंटला ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bogus vadhu var suchak mandal in barshi huge financial fraud of hundreds of youths
वधू-वर परिचय मेळाव्यात वधूच दाखवली नाही; शेकडो लग्नाळू तरुणांची मोठी आर्थिक फसवणूक


वधू-वर सूचक मेळाव्यात वधूच दाखवली नाही

बार्शी शहरातील एका मंगल कार्यालयात सुशिक्षित तरुणांचा वधू वर पालक परिचय मेळावा आयोजित केला होता. सदर बार्शी शहरात वधू वर मंडळाकडून तिसरा मेळावा घेण्यात आला होता. मात्र, मेळाव्यात लग्नाळू तरुणांना वधूच दाखवण्यात आली नाही. बार्शीतील मेळाव्यात हीच परिस्थिती होती. त्यामुळे भावी नवरदेवांच्या नातेवाईकांना संशय आला. वधूच दाखवली नसल्याने वर मंडळींनी संताप व्यक्त करत मेळावा चालकाला धारेवर धरले होते.

बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद

आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर लग्नाळू तरुण, कुटुंबीय, नातेवाईक बार्शी पोलीस ठाण्यात पोचले. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला. यात लग्नाळू मुलांच्या आई-वडिलांकडून लग्न जुळवण्यासाठी पैसे घेतल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे कथित वधू-वर मंडळाचे बनावट रॅकेट उघड झाले. पोलिसांनी वधू-वर मंडळ चालक, महिला, एजंटला ताब्यात घेतले आहेत.

तीन ते दहा हजार रुपयांपर्यंत उकळले पैसे

पालक व तरुण आज या ठिकाणी मुलगी दाखवली जाईल. तसेच मुलगी पसंत पडताच लगेच लग्न लावून दिले जाईल, असे आश्वासन दिले जात होते. यासाठी लग्नाळू तरुण तसेच त्यांच्या नातेवाइकांकडून रजिस्ट्रेशन फी म्हणून प्रत्येकी हजार रुपये व डिपॉझिट म्हणून तीन ते दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम घेतल्याची बाबदेखील समोर आली आहे.

उड्डाणपुलावरून पडून ११ काळविटांनी गमावला जीव, अचानक समोर वाहन आल्याने बिथरला कळप

आजतागायत एकही लग्न लावून दिले नाही

हे वधू वर सूचक मंडळ नोंदणीकृत नाही. तसेच या मंडळाने आजपर्यंत एकही लग्न लावून दिलेले नाही. केवळ आश्वासने दिली. पोलिसांच्या वधू-वर मंडळ चालक असलेल्या महिलेच्या बोलण्यावरून दिसून आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर बोगस वधू-वर सूचक मंडळाचे बिंग फुटले.

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत चौकशीच्या फेऱ्यात, शिंदे गटाच्या नेत्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे निर्देश

महत्वाचे लेख